चालकांना डबल ड्युटीमुळे अपघाताची शक्यता
| मुरूड जंजिरा | प्रतिनिधी |
मुरूड जंजिरा एसटी आगारात सध्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून कधी कोणता अपघात घडेल याचा नेम नसल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मुरूड बस आगारात सध्या 34 शेडुल्स सुरू असून याकरिता 34 जुन्या बसेस उपलब्ध आहेत. बस आगारात 170 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतानाही 137 कर्मचारी उपलब्ध आहेत. यामध्ये तांत्रिक कर्मचारी आणि चालक संख्या अत्यंत कमी आहे.मुरूड एसटी आगारात चालक संख्या कमीअसल्याने उपलब्ध चालकांना वारंवार डबल ड्युटी करावी लागत आहे.चालकांना विश्रांती मिळत नसल्याने ब्रेन स्ट्रोक, उच्च रक्तदाब यासारखे आजार अचानक निर्माण होत आहेत.अशा वेळी ड्युटीवर असताना म्हणजे वाहन चालवीत असताना रक्तदाब वाढल्यास अथवा ब्रेन स्ट्रोक आल्यास एसटीला मोठा अपघात होऊन प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते एसटी चालकांना आठ तासांच्या ड्युटीनंतर विश्रांती खूप महत्वाची आहे.परंतु याचे अजिबात पालन केले जात नाही.गेल्या काही दिवसात असे प्रकार झाले असून उघडकीस आलेले नाहीत असे कळते. मुरूड आगरात सभोवताली अंतर्गत काँक्रिटीकरण देखील रखडलेले असून बस आल्यानंतर किंवा बाहेर पडताना मातीची धूळ उडून प्रवाशांना त्रास होऊन आरोग्य बिघडत आहे. मुरुडकरांनी वारंवार मागणी करुनही कित्येक वर्षांपासून एसटी प्रशासन या समस्येकडे अजिबात लक्ष देत नाही. तांत्रिक कर्मचारी देखील आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या बस गाड्यांची बारकाईने वेळेवर दुरुस्ती होत असेल असे दिसून येत नाही.निष्णात प्रशिक्षित चालक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची येथे आवश्यकता आहे.सध्या काही प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असली तरी जुन्या गाड्यांच्या पार्श्वभूमीवर ही संख्या अपुरीच आहे.
मुरूड बस आगारातील गाड्यादेखील खिळखिळ्या झालेल्या आहेत. येथे तालुक्यात रेल्वे सेवा उपलब्ध नाही.हा संपूर्ण डोंगरी तालुका आहे. एसटी सेवेवरच प्रवाशांची,येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची, पर्यटकांची मोठी मदार अवलंबून आहे. दर दिवश प्रवाशी सेवेचे सुमारे तीन लाख रुपयांचे भरपूर उत्पन्न मिळत असूनही आगारात ही अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे.एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर एस टी महामंडळाला जाग येईल असे दिसते. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी एस टी आगरांचा आढावा घेताना एकूणच स्वच्छता आणि सुरक्षितता यावर भर देत प्राधान्य आणि तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताही मुरूड जंजिरा आगारात अशी भयंकर परिस्थिती असणे म्हणजे चालकांसहित प्रवाशांच्या जीवाशी खेळच नाही का ? हा प्रकार म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासण्या सारखेच आहे.एस टी महामंडळाच्या मुख्य कार्यलायाने मुरूड आगारात निर्माण झालेल्या परिस्थितीचा वेळीच विचार करून दुर्घटना टाळावी.






