प्रवाशांची तीव्र नाराजी
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
गणेशोत्सव सुरू असल्याने अनेक चाकरमानी गणेशभक्त एसटीने मुरूड तालुक्यात दाखल झालेले आहेत. मुरूड एसटी आगारात गुरुवारी सकाळी फेरफटका मारला असता असे लक्षात आले की, आगाराला प्रवेशद्वार राहिलेले नसून, शौचालय आणि मुतारीची स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. वॉश बेसिनला हिरव्या शेवाळाने घेरले आहे. या प्रकारामुळे प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी पसरली आहे.
मुरूड आगरात प्रवेश करताना जागोजागी खड्डे पडून पाण्याची तळी साचली आहेत.त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात जाताना खूपच त्रासदायक ठरत आहे. आगाराचे प्रवेशद्वार गंजून तुटून गायब झाले आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री कोणताही अनुचित प्रकार होऊ शकतो. मोकाट गुरे आदींवर कोणाचेही नियंत्रण राहू शकत नाही. एसटी आगार ही शासकीय मालमत्ता असल्याने येणारा-जाणारा रस्ता आणि काही भाग 4 ते 5 वर्षांपासून असाच असून, सुरक्षितता म्हणून अशा गोष्टी गरजेच्या असताना अनेक दिवसांपासून अशी दुरवस्था दिसून येत आहे.
आगारातील काही भागाचे काँक्रिटीकरण यापूर्वीच झाले आहे, तर काही भाग बाहेर पडेपर्यंत खराब अवस्थेत खितपत पडला आहे. आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी सांगितले की, या मार्गावर लवकरच पेवर ब्लॉक बसवून रस्ता आणि परिसर मजबूत केला जाणार आहे. बस गाड्या आणि साफसफाईसाठी हंगामी कामगार नेमलेले असून, यातील किती जण पूर्ण जबाबदारीने आणि क्षमतेने काम करीत आहेत याबाबत प्रश्नचिन्ह आहे. शौचालय, मुतारीच्या दुरवस्थेवरून स्वच्छतेची कल्पना येऊ शकते. वॉशबेसिनला शेवाळ कित्येक दिवसांपासून साचली आहे. मुरूड आगारात नवीन बस गणेशोत्सवात तरी अद्याप आलेली नाही.
चाकरमान्यांसाठी आठ जादा बसेस
परत जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी 24 सप्टेंबरपासून मुरूड आगारातून नेहमीच्या व्यतिरिक्त आठ जादा बस गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी दिली. नालासोपारा-1, बोरिवली-3, भाईंदर-1, मुंबई- 3 अशा एसटी बस सोडण्यात येतील. उपलब्ध प्रवाशांच्या संख्येनुसार आणि मागणीनुसार बस सोडल्या जाणार आहेत, असेही जगताप म्हणाल्या.