। कोर्लई । वार्ताहर ।
सकाळच्या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी सुपेगाव ते मुरुड एस.टी. सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे तालुका उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण यांनी मुरुड आगारप्रमुख वाकचौरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी, मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यालगत असलेल्या सुपेगाव या गावातील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी सर एस.ए. हायस्कूल मुरुड येथे सकाळच्या सत्रासाठी प्रवेश घेतला आहे. वरील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य होत नाही, त्यामुळे या मुलांना पहाटे सुपेगाव ते उसरोली फाट्यापर्यंत चालत जावे लागते. मुरुड-सुपेगाव बस पुन्हा सुरु करून विद्यार्थ्यांना होणारी पायपीट थांबवावी, तसेच या बसने नांदगाव-मुरुड बसवरील असणारा अतिरिक्त ताणही कमी होण्यास मदत होईल. या बसने नांदगाव, मजगाव, विहूर, मोरे इत्यादी गावांतील विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होईल. याप्रसंगी महेश मानकर, निखिल तळेकर, क्षितिज कळले, विरेंद्र सुर्वे, प्रणव बागवे आदी उपस्थित होते.