कराटेपटूंकडून पदकांची लयलूट; मुरुड तालुका अव्वल

अलिबाग तालुका ठरला उपविजेता

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

अलिबाग येथील नेहरू युवा केंद्र व रायगड जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड-जंजिरा एज्युकेशन सोसायटीच्या ओमकार विद्यामंदिर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मुरुड तालुक्याला अव्वल क्रमांक मिळाला, तर अलिबाग तालुक्याने उपविजेतेपद प्राप्त केले. या स्पर्धेत मुरुडच्या खेळाडूंनी 20 सुवर्ण, 11 रौप्य, तर 15 कांस्यपदके अशा एकूण 45 पदकांची लयलूट केली.

मुरुड तालुक्यात प्रथमच जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा अलिबाग येथील नेहरू युवा केंद्र (अध्यक्ष निशांत रौतेला) आणि रायगड जिल्हा कराटे असोसिएशन (शिहान-नंदकुमार वरसोलकर) यांच्या सहकार्याने घेण्यात आली.

या स्पर्धेमध्ये मुरुड, अलिबाग, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, तळा इत्यादी तालुक्यांतील विविध शाळांतील 130 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यात मुरुड तालुक्याने प्रथम क्रमांक, अलिबाग तालुका द्वितीय, तर माणगाव तालुक्याने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत 20 सुवर्ण पदक, 11 रौप्य पदक, 15 कांस्यपदकं अशा एकूण 45 पदकांची कमाई मुरुड तालुक्याने केली. या जिल्हास्तरीय कराटेच्या स्पर्धेसाठी लाभलेले रेफ्री व जजचे काम शिहान नंदकुमार वरसोलकर, शिहान- संजय गमरे, रेंनशी- अरविंद भोपी, सेंसाय- सनी राजेंद्र खेडेकर, सेंसाय- प्रशांत म्हात्रे, सेंसाय- ओमकार वरसोलकर, सेंसाय- शिवम सिंह, सेंसाय- पर्वणी चोरघे, सेंपाया- तन्वी म्हात्रे, सेंपाया- अनुज भोईर, सेंपाया- श्रेयस गमरे, प्रवेश पुलेकर, साहिल अन्सारी इत्यादींचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप जोशी, दिपाली जोशी (विश्‍वस्त), सुनील विरकुड (चिटणीस), उषा खोत (ओमकार विद्या मंदिर सदस्य), पांडुरंग आरेकर (माजी नगरसेवक व क्रीडा शिक्षक सर एस.ए. हायस्कूल), शिवप्रसाद रोडगे (रा.जि.प. शाळ शिघ्रे मुख्याध्यापक व जिल्हा केंद्रप्रमुख), अमित पाटील (आर्मी ऑफिसर), युवराज भगत (मुरुड तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना), ज्येष्ठ पत्रकार मदन हनुमंते, विनायक धुमाळ, राहुल कासार, मुकरी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version