ऑक्टोबर हिटमुळे मुरूडकर घामाघूम

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
ऑक्टोबर हिट अचानक वाढल्याने मुरूडकर जनता घामाघूम होताना दिसून येत आहे. मुरुडचा उष्णता पारा 32 वर पोहचला असून मुरूडकरांच्या कपाळावर घामाच्या धारा वाहताना दिसत आहेत. यंदा3700 मिमी पेक्षा अधिक पाऊस तालुक्यात पडला असला तरी विचित्र हिट वाढल्याने प्रचंड घामा बरोबरच पाण्याची तहान देखील सतत लागत आहे.
सायंकाळी मुरूड, राजपुरी आणि आजूबाजूच्या गावातील गावातील नागरिक उष्णतेची काहिली दूर करण्यासाठी समुद्र किनारी येऊन थंड हवामाना चा आस्वाद घेताना दिसुन येत आहेत. पर्यटनाची विस्कळीत झालेली घडी नोव्हेंबर पासून थंडी पडल्यास आधिक मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होईल असा विश्‍वास या क्षेत्रातील मंडळीनी व्यक्त केला आहे. मुरूड तालुक्यातील सर्व ऐतिहासीक स्मारके, डोंगरी आणि जलदुर्ग आता पूर्णपणे सुरू करण्यात आल्याने पर्यटक येऊ लागले आहेत.नोव्हेंबर महिन्यापासून पर्यटकांचा ओघ तिपटीने वाढण्याचे संकेत लॉजिंग मालकांकडून मिळत आहेत. सध्या मात्र ऑक्टोबर हिटचा सामना काही दिवस करावाच लागेल असे चित्रं आहे. समुद्र जवळ असल्याने मुरुड परिसरात दमट हवामान असते. हवेत खार्‍या हवेचे अधिक प्रमाण असल्याने शरीरावर येणार्‍या घामामुळे खाज सुटते. यंदा भरपूर पाऊस पडला असला तरी उष्णतेचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. ऑक्टोबर हिटच्या झळा गेल्या आठवड्यापासून जाणवायला लागल्या आहेत. या महिन्यात समुद्र किनारी सी-गर्ल पक्ष्यांचे आगमन देखील झाले असून त्यांच्या जलक्रीडा पाहताना मन सुखावते.

शहाळी, शितपेयांची मागणी वाढली
हिट वाढती असल्याने मुरूड परिसरात शहाळी, शितपेयांची मागणी वाढती आहे. मुरूड परिसरात प्रत्येकी शहाळ्याचा दर 30 रूपये इतका असून लिंबु सरबत, गोळा सरबत पर्यटक आणि स्थानिक नागरिक समुद्र किनारी जाऊन याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. समुद्रकिनारी असलेले सुमारे 40 स्टॉल्स आता सुरू झाले आहेत.

Exit mobile version