तापमान 38 सेल्सिअस, समुद्राचे पाणी देखील तापले
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
गेल्या चार दिवसांपासून मुरूड तालुक्यातील तापमान मोठया प्रमाणात वाढले असून अति उष्णतेने मुरूडकर बेहाल झालेले दिसून येत आहेत.मंगळवारी दुपारी मुरूड तालुक्याचे तापमान तब्बल 38 सेल्सिअस वर पोहचले आहे.कडक उष्णतेमुळे समुद्राचे पाणी देखील तापल्याचे जाणवत असून मासळीला धोका निर्माण होऊ शकतो किनार्यावर पाणी आधिक गरम होत असल्याने मासळी येत नाही आणि अंडी देण्यासाठी मासळी आली तर अंड्याचा नाश होतो अशी माहिती मुरूड महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष श्री मनोहर बैले आणि मच्चीमारांनी मंगळवारी बोलताना दिली.गेल्या आठवड्यात तापमान 39 सेल्सिअस च्या वर गेले होते. गेल्या 30 वर्षातील हा उच्चांक असल्याचे सांगण्यात आले. तीव्र तापमानामुळे नागरीक सातत्याने घामाघूम होत असून दुपारी बाजारपेठेतील रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.
अति उष्णतेमुळे उष्माघात होण्याची शक्यता व्यक्त होत असून भारत सरकारने उष्णता आधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करीत सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.यामुळे दुपारी कामा शिवाय बाहेर पडण्याचे टाळावे.शहाळी, लिंबू पाणी प्यावे, भरपूर पाणी प्यावे असे उपाय सुचविण्यात आलेले आहे. पावसाप्रमाणे सकाळी वातावरण अधे मधे आकाशात पसरते मात्र अवकाळी पाऊस गेल्या 15 दिवसात पडलेला नाही. रविवारी काशीद बीचवर पर्यटकांची मोठी उपस्थिती असली तरी मुरूड बीचवर फारसे पर्यटक दिसून आले नाहीत.तापमान वाढीचा देखील हा परिणाम असू शकतो. मात्र मुरूडमध्ये असलेली पर्यटन स्थळे आधिक मोठया प्रमाणात विकसित केल्यास युवा पर्यटक आकर्षित होऊ शकतात अशी माहिती हिरा रेसिडेन्सी चे मालक महेंद्र पाटील, यांनी बोलताना दिली.
वाढलेल्या तापमानामुळे मुरूड मध्ये पर्यटकांची संख्या रोडवल्याचे दिसून येत असून याला काही व्यवसायकांनी दुजोरा दिला.अशातच समुद्राच्या पाण्यात ऑइल वाहून येत असल्याने पर्यटकांनी काशीद किंवा अन्य बीचवर प्रस्थान केल्याचेही दिसून आले.आधिक माहिती घेता अशी माहिती मिळाली की, वालुकामय प्रदेशातून उष्ण वारे वाहत असून या मुळे सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.
तापमान वाढल्यामुळे नागरिकांच्या कपाळावरून घामाच्या धारा लागत असून अनेकांची दुपारी भूक देखील नाहीशी झाली आहे. सतत तहान लागत असून जीव कासावीस होत असल्याचे मुरूडमधील भाजी विक्रते यांनी सांगितले. अशा प्रकारचा उष्मा प्रथमच अनुभवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दुपारी भाजी मार्केट मध्ये देखील ग्राहक येत नसल्याने शुकशुकाट असतो. अति उष्णतेमुळे भाज्यां लवकर सुकत असून टवटवीत पणा नष्ट होत असल्याने नुकसान होत आहे.
-कासेकर







