प्रचंड उकाड्याने मुरुडकर हैराण

वाढते तापमान धोकादायक

|मुरूड जंजिरा | वार्ताहर |

तापमान वाढते असल्याने सर्वच जण हवालदिल झाले आहेत. पर्यटन तालुका असणार्‍या मुरूड तालुक्यातील तापमान सोमवारी दुपारी जवळजवळ 39 वर गेल्याने घरातदेखील बसणे अवघड बनल्याचे जाणवले. दुपारी मुरूड, मजगाव, नांदगाव, बोर्ली आदी मोठ्या बाजारपेठादेखील सुनसान दिसून आल्या. अवकाळी पाऊस येऊन हवेत काहीसा थंडावा येईल ही अपेक्षादेखील फोल ठरल्याचे दिसून आले. प्रचंड उकाड्याने मुरुडकर हैराण झाल्याचे दिसून आले. यावर्षी प्रचंड उष्णतामान वाढल्याने सर्वत्र चिंतादेखील व्यक्त झाली आहे. पशुपक्षी, प्राणी आणि मानवालादेखील वाढत्या तापमानाची मोठी झळ लागत असून, थंडावा घेण्यासाठी अनेक मार्ग शोधत आहेत.

मुरूडसारख्या समुद्रकिनारी असणार्‍या तालुक्यात सामान्यपणे तापमान दमट असते. हवेत मिठाचा अंश असल्याने शरीराच्या अंतर्गत भागात घाम येऊन खाज येऊ शकते. परंतु, वातावरणीय समतोल बिघडल्याने समुद्रकिनारीदेखील तापमान वाढून 40 ते 41 सेल्सियसपर्यंत गेल्याचेदेखील अनुभवायला मिळाले आहे. अवकाळी पाऊस, तौक्ते, निसर्ग सारखी वादळे, वाढते तापमान अशा संकटांची यादी पाहिली की भविष्यात मानवापुढे कशी संकटे येऊ शकतात याचा सिग्नल निसर्ग देत आहे. समुद्रातील वाढते प्रदूषण, बेसुमार बेकायदेशीर होणारी वृक्षतोड, धूर ओकणारे केमिकल कारखाने, वाहनांचे प्रदूषणासह अनेक धोकादायक गोष्टींमुळे समतोल वातावरणाचा तोल सांभाळण्यापलीकडे गेला असून, त्याचाच हा सर्व परिणाम असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version