दोन महिन्यानंतर मासळी विक्रीला; भाव मात्र गगनाला
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
तब्बल दोन महिन्यानंतर मुरूडच्या मार्केटमध्ये रविवारी सुरमई, कोलंबी, पापलेट, आंबाड, बांगडा, कालव, जिताडा, तांब, बोईट, करली, पाला, रावस, आदी मासळी विक्रीस आल्याने मार्केटचा परिसर ग्राहकांनी फुलला होता; मात्र मासळीचे भाव स्थानिकांना परवडणारे नव्हते. पर्यटक मात्र ताजी मासळी खरेदीसाठी सरसावल्याचे दिसून येत होते. खूप दिवसांनी मासळी मार्केटमध्ये स्थानिक आणि पर्यटकांची मोठी हजेरी दिसत होती.
वादळी वातावरण आणि अति थंडीमुळे दीड ते दोन महिने मासळी मिळत नसल्याने बहुसंख्य नौका किनार्यावर परतल्या होत्या. काहीशी उघडीप मिळाल्याने आणि हाताशी पैसे नसल्याने काही नौका जवळील समुद्रात मासेमारीस गेल्या होत्या. भरपूर नाही परंतु काहीशी मासळी मिळाल्याने नौका सकाळी किनार्यावर परतल्या. समुद्र किनारी मार्केट जवळ मासळीचा लिलाव करून मासळी मार्केटमध्ये रवाना करण्यात आली. यावेळी स्थानिक खवय्यांनी मोठी गर्दी केली; मात्र छोटी सुरमईचा दर 500 रूपये, कोलंबीचा वाटा 200 रूपये, तांब 500 रूपये , पापलेट जोडी 700 रूपये, आंबाड वाटा 60 रूपये असे चढलेले भाव होते. मुरूडमध्ये समुद्र जवळ असूनही मासळीचे वाढलेले दर पाहून पर्यटक देखील अवाक झाल्याचे दिसत होते.
अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आदी समुद्रकिनारी मिळणारी ताजी मासळी खाण्यासाठी बहुतांश पर्यटक येत असतात. परंतु समुद्रात वाढलेले प्रदूषण, रोज बदलणारी वातावरणाची परिस्थिती यामुळे गेल्या 5 वर्षात मासळी मिळण्याचे प्रमाण घटत गेले.