| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढता असल्याचे जाणवले. तालुक्याचा पारा 35 सेल्सियसपर्यंत पोहोचला असून, दुपारी बाजारपेठा ओस पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. तापमान अजून वाढण्याची शक्यता असून, बुधवारच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.
होलिकोत्सव असल्याने मुंबईत असणारे मच्छिमार आपल्या सजवलेल्या नौका घेऊन जय्यत तयारीनिशी गुलाल उधळीत आणि जल्लोष करीत मुरुड, एकदरा, राजपुरी, दिघी बंदराकडे येत आहेत. शनिवारपर्यंत बहुतांश नौका परिसरात दाखल होतील, अशी माहिती कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते मनोहर बैले यांनी शुक्रवारी दिली. मुरूड मार्केटमध्ये मासळीचा दुष्काळ असून कोलंबी, मांदेली मासळीशिवाय अन्य मासळी मिळणे दुरापास्त झाले आहे. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता आधिक असून, मुरुडकर बेजार होताना दिसत आहेत. ज्येष्ठ नागरिक उन्हाच्या काहिलीने व्याकुळ झालेले दिसून येत आहेत. रात्री थंडावा, तर दुपारी कडक उन्ह असा हवामानाचा विचित्र सामना नागरिकांना करावा लागत आहे.






