मुरुडचे विश्रामगृह कोरोनाच्या कचाट्यात;लाखोंच्या साहित्याची धूळधाण

कोव्हिड सेंटरपासून मुक्ती होणार तरी कधी? इमारतीची पार दुरवस्था

| कोर्लई | वार्ताहर |

22 मार्च 2020 पासून देशावर कोरोना महामारीचे मोठे संकट आले होते. यावेळी रुग्णालयात रुग्ण सुविधा कमी पडत असल्याने शाळा, महाविद्यालय, शासकीय विश्रामगृह ताब्यात घेऊन या ठिकाणी कोव्हिड केंद्र सुरू करण्यात आली होती. आता हे संकट सरले तरी मुरुडचे शासकीय विश्रामगृह अजून काही कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झालेले नाही.आज या इमारतीची पार दुरवस्था झाली असून, आतील लाखोंच्या साहित्याची अक्षरशः धूळधाण झाली आहे. मुरुड जंजिरा हा पर्यटन स्थळ असल्याने येथे अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पर्यटक येत असतात. त्यांच्या निवासाची गैरसोय होत आहे. त्यामुळे हे शासकीय विश्रामगृह कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त होणार कधी, असा सवाल उठत आहे.

कोरोनाची लाट उसळली होती ती आता ओसरली आहे. सर्व नियम शिथील करण्यात आले आहेत. सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. सर्व शाळा, महाविद्यालय पूर्णपणे सुरू झाली आहेत. पर्यटक मुरुडला येऊ लागले आहेत. मुरूड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारीसुद्धा येत आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था ही शासकीय विश्रामगृहात होत नसल्याने त्यांना न थांबताच परतावं लागत आहे. शासनाच्या संबंधित महसूल, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम खात्याने यात लक्ष पुरवून सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह लवकरात लवकर खुले व्हावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी शहरातील खासगी डॉक्टर यांच्याकडून उपलब्ध झालेले बेड्स त्यांना परत करुन, उर्वरित लोकसहभागातून प्राप्त झालेले बेड्स व इतर साहित्य आपल्या ताब्यात घेऊन आपल्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रास दिल्यास सदरचे साहित्य सुस्थितीत राहून वापरास उपयोगी येईल. तसेच शासकीय विश्रामगृह उपभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मुरुड यांस तातडीने खाली करुन त्यांच्या ताब्यात देता येईल, असे तालुका आरोग्य अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. सदर पत्राच्या प्रती जिल्हा आरोग्य अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांस माहिती व उचित कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहे.

Exit mobile version