36 लाख रुपयांचा निधी पाण्यात
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग विधानसभा मतदार संघाचा मी आमदार आहे, अशा बतावण्या करणाऱ्या आमदार दळवी यांचा मुरूडमधील शाश्वत विकास एका महिन्यातच कोसळल्याचे चित्र समोर आले आहे. मागील जून महिन्यात सोलरवर चालणाऱ्या हायमॅक्सचे भूमीपूजन थाटामाटात करण्यात आले. मात्र, एक महिन्यातच हायमॅक्सचे खांब कोसळले आहेत. नगरोत्थान योजनेतून 36 लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा सध्या मुरूडमध्ये जोरादार सुरू आहे.
लाखो करोडो रुपयांचा निधी विकासाठी आणला आहे, अशा जाहीरातबाजी विद्यमान आमदार दळवी कायमच करीत आले आहेत. परंतु, तो निधी कुठे गेला असा प्रश्न मतदार संघातील नागरिकांना पडत आला आहे. मूरूड शहर प्रकाशमान व्हावे, म्हणून 14 ठिकाणी हायमॅक्स बसविण्याची योजना राबविण्यात आली. 27 जूनला या कामाचा भूमीपूजन सोहळा दळवी यांच्या हस्ते झाला.अवघ्या दहा दिवसात हायमॅक्स बसविण्यात आले. त्यामुळे अंधारातून प्रकाशाकडे येण्याची आशा मुरूडकरांना होती. परंतु, ही आशा फेल ठरली आहे. एका महिन्यातच हायमॅक्स दिवे बंद पडले आहेत. अनेक हायमॅक्सचे खांब पडले आहेत. हायमॅक्स दिव्यांनी लोटांगण घातल्याने लाखोचा विकास अडवा पडला आहे. त्यामुळे ही योजना बारगळली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. एका महिन्यात हायमॅक्स दिवे कोसळल्याने मूरूडकरांची घोर निराशा झाली आहे. मुरूडचे मुख्याधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजीचे सुर उमटत आहे. त्यामुळे ठेकेदारावर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अतिशय घाईत हे काम केले आहे. 27 जूनला आमदारांनी या कामाचे भूमीपूजन केले. 28 दिवसानंतर रिचार्ज संपला. सध्या पोल पडले आहेत. विकासाने लोंटांगण घातले आहे. नगरपरिषदेच्या इंजिनिअरकडे विचारणा केली, असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले. निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले होते. नगरोत्थान योजनेमधून 36 लाख रुपयांचा निधी वापरण्यात आला. हायमॅक्स दिव्यांचा दर्जा खराब आहे. त्यामुळे ठेकेदारावर काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मनिष माळी,
उपाध्यक्ष, शेकाप मुरूड तालुका पुरोगामी युवक संघटना







