मुश्ताक अंतुलेंचा राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाचा निर्णय आत्मघातकी: महेंद्र घरत

। अलिबाग । प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या विरोधात कायमच भूमिका घेतली होती. त्यामुळे असंख्य मुस्लीम समाज आजही तटकरेंवर कमालीचा नाराज आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुश्ताक अंतुले यांचा अजित पवार गटात जाऊन तटकरेंना मदत करण्याचा निर्णय हा आत्मघातकी असून, त्यांची ही भूमिका अत्यंत चुकीची ठरणार आहे, असे परखड मत काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केले.

राजकारणात ज्यांचे बोट धरून सुनील तटकरे चालू लागले, त्याच बॅ. अंतुले यांची कारकीर्द सुनील तटकरे यांनीच संपविली, हे काही लपलेले नाही. माजी मुख्यमंत्री अंतुले यांचा फोटो प्रचार बॅनवर लावण्याचा अधिकार तटकरेंना अजिबात नाही. मात्र, या लोकसभा निवडणुकीत तटकरेंना पराभव दिसत असल्याने ते राजकीय खेळी करत आहेत. हे मतदार चांगलेच ओळखून आहेत. त्यांनी आता मुस्लीम समाजाची मते मिळविण्यासाठी फोडाफोडीची केविलवाणी धडपड सुरु केली आहे. मुश्ताक अंतुले हे बॅ. अंतुले यांचे जावई आहेत, शिवाय ते मोठे नेते आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात मानणारा वर्ग रायगड लोकसभा मतदारसंघात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) जाण्याच्या तयारीत अंतुले असल्याचे समजताच मी त्यांची नुकतीच भेट घेतली. या विषयवार त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, त्यांनी कौटुंबिक कारण सांगितले. तटकरे यांच्या दुटप्पी आणि फसव्या वृत्तीमुळे बॅ. अंतुले यांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना आपल्यापासून दूर ठेवले. त्यामुळे मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा ठरणार असल्याकडे घरत यांनी लक्ष वेधले.

मी येत्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे, अशी माहिती स्वतः काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुले यांनी ‌‘कृषीवल'शी बोलताना दिली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत जिल्ह्यात सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Exit mobile version