हेमंत देसाई
इलॉन मस्क यांनी ट्विटरशी संबंध जोडण्याचा विचार केल्यामुळे त्यांच्या मूळ व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. आज जगातल्या सर्व प्रमुख उद्योगपतींची संख्या लक्षात घेतली तर त्यातल्या बहुतेकांनी आपल्या उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर केल्याचं आढळतं. या दृष्टीनेही मस्क यांनी अत्यंत दूरदृष्टीनं विचार केला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
अलिकडे इलॉन मस्क हे नावचर्चेत आहे. ही कॅनेडियन अमेरिकन व्यक्ती टेस्ला मोटर्स या विख्यात कंपनीची संस्थापक आणि मुख्याधिकारी आहे. स्पेस एक्स आणि सोलर सिटी या कंपन्याही त्यांच्याच मालकीच्या. मस्कची आई कॅनेडियनंतर वडील दक्षिण आफ्रिकेतले आहेत. त्यांचं बालपण दक्षिण आफ्रिकेत गेलं. अर्थशास्त्र आणि पदार्थविज्ञान या विषयांमधील पदवी संपादन केल्यानंतर 1995 मध्ये ते कॅलिफॉर्नियात आले आणि ‘झिप 2’ ही वेब सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. 1999 मध्ये ही स्टार्ट अप कंपनी ‘कॉम्पॅक’ या कंपनीने तीस कोटी डॉलर्सला खरेदी केली. त्याच वर्षी मस्कने ‘एक्स डॉटकॉम’ ही ऑनलाइन बँक स्थापन केली. पुढच्याच वर्षात ही बँक ‘कॉन्फिनिटी’मध्ये विलीन झाली आणि त्यातूनच पुढे ‘पेपाल’ची स्थापना झाली. 2002 मध्ये ‘ईबे’नं ‘पेपाल’ दीड अब्ज डॉलर्सना खरेदी केली. 2002 मध्येच मस्कने ‘स्पेस एक्स’ ही एरोस्पेस उत्पादन आणि अवकाश वाहतूक सेवा कंपनी स्थापन केली. 2004 मध्ये ‘टेस्ला मोटर्स’चे संस्थापक म्हणून त्यांचं नाव झालं आणि इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादक म्हणून त्यांनी आपली नाममुद्रा कोरली.
काही दिवसांपूर्वी ट्विटरने मस्क यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि अमेरिकेच्या रोखे व्यवहार आयोगाला ट्विटर कंपनीद्वारे तशी कागदपत्रं सुपूर्द करण्यात आली. नव्या नियुक्तीनुसार मस्क हे ट्विटरचे 14.9 टक्के भागांपेक्षा जास्त भागभांडवल घेऊ शकणार नाहीत. ट्विटरच्या संचालक मंडळाला ते नवी उंची प्राप्त करून देतील, अशी आशा ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी व्यक्त केली. मस्क यांना ट्विटरच्या जागतिक भूमिकेविषयी विशेष काळजी आहे आणि ते ही धुरा सांभाळायला समर्थ आहेत, असं मत ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से यांनी व्यक्त केलं. मात्र यानंतर वेगळ्याच घडामोडी घडल्या. म्हणूनच त्यासंबंधी चर्चा सुरू झाली.
ट्विटरवर मुक्त अभिव्यक्तीबद्दल आक्षेप असूनही आपण या कंपनीचं 9.2 टक्के भागभांडवल खरेदी केलं आहे, असं स्वतः मस्क यांनीच जाहीर केलं. या अधिग्रहणामुळे ते या कंपनीचे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक बनले. परंतु त्यानंतर लगेचच मस्क यांनी ट्विटर वापरकर्त्यांना ‘संपादन’ हा पर्याय निर्माण करण्याबद्दल आपापलं मत देण्याचं आवाहन केलं. या आवाहनाचे दूरगामी परिणाम होणार असून ट्विटर वापरकर्त्यांना काळजीपूर्वक मतदान करण्याचं इशारावजा आवाहन अग्रवाल यांनी केलं. यातूनच मस्क यांचं आवाहन अग्रवाल यांना रुचलं नसल्याचं स्पष्ट दिसलं. येत्या काही महिन्यांमध्ये ट्विटरमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यावर आपला भर असेल, असं मस्क यांनी संगितलं. सुरुवातच अशी झाल्यानंतर मस्क यांनी आता संचालक मंडळात आपण सहभागी होणार नसल्याचं जाहीर केल्यामुळे औद्योगिक जगतात खळबळ माजणं स्वाभाविक आहे.
वास्तविक, कंपनीचे सर्वात मोठे भागधारक संचालक मंडळात सहभागी होत असतील तर त्याचा ट्विटरला फायदाच होईल, असं व्यवस्थापनास वाटत होतं. परंतु मस्क हे आपल्या भूमिकेबाबत अत्यंत आग्रही आहेत. अर्थात ते उद्या आपल्या डोक्यावर बसले तर काय, अशी भीती व्यवस्थापनाला वाटली असावी. त्यामुळेच ‘मस्क यांच्या सूचना खुल्या मनानं स्वीकारू, परंतु कंपनीपुढे असलेल्या अनेक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रयत्न करु आणि ध्येयापासून किंचितही ढळणार नाही; कोणते निर्णय घ्यायचे आणि ते कसे राबवायचे हे संपूर्णपणे आमच्या हातात आहे,’ असं प्रसिद्धीपत्रकच पराग अग्रवाल यांनी काढलं. मस्क यांनी तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च करून ट्विटरमध्ये प्रवेश केला असला तरी कंपनीची दिशा ते नव्हे तर आपणच ठरवू, असंच ट्विटरच्या व्यवस्थापनाने सूचित केलं आहे.
मस्क यांचं व्यक्तिमत्त्व ठाम आणि आक्रमक आहे. टेस्लाचं उत्पादन भारतात आणण्याचा विचार मस्क करत होते. भारतातून त्यांच्याकडे ऑफर्सचा अक्षरशः पाऊस पडत होता. एवढंच कशाला, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात टेस्लाचा प्रकल्प उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू; पण तुम्ही या, या शब्दांमध्ये आमंत्रण दिलं होतं. परंतु भारतात सरकारी पातळीवर अनेक आवाहनांचा सामना करावा लागत असून उत्पादनाच्या आरंभाची वेळ सांगू शकत नाही, असं मस्क पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे केंद्र सरकारचे अधिकारी नाराज झाले. ‘टेस्ला’ भारतात उत्पादन करण्याबाबत वचनबद्धता जाहीर करत नाही, तोपर्यंत शुल्ककपातीची मागणी करू शकत नाही, असं अधिकार्यांनी स्पष्ट केलं.
मस्क यांची कंपनी जगातली आघाडीची इलेक्ट्रिक कार कंपनी असून ते जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. असा अब्जाधीश उद्योगपती आपल्या राज्यात यावा यासाठी तेलंगण, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांचे मुख्यमंत्री आग्रही होते. परंतु टेस्लासारखी कंपनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राचीच निवड करेल, असं वाटत असतानाच मस्क यांनी बंगळुरूमध्ये आपलं कार्यालय स्थापन केलं. सरकारकडून विशिष्ट सवलती मिळाल्याच पाहिजेत, या भूमिकेवर ते ठाम आहेत. ट्विटरवर मुक्त अभिव्यक्तीबद्दल आक्षेप असूनही मी या कंपनीत गुंतवणूक केली आहे, असं सांगून मस्क यांनी ट्विटरच्या काही गोष्टी आपल्याला पसंत नसल्याचं अधोरेखित केलं. बहुतेक उद्योगपती अतिशय सावधपणे बोलत असतात आणि शक्यतो कोणतीच भूमिका व्यक्त करत नाहीत. मस्क यांचं मात्र तसं नाही. ट्विटरचं सॅनफ्रॅन्सिस्को इथलं मुख्यालय बेघर लोकांच्या आश्रयस्थानात परिवर्तीत केलं जावं का, याबद्दल मस्क यांनी एक जनमत चाचणी घेतली. या चाचणीत साडेसात लाख लोकांनी सहभाग घेतला आणि सर्वाधिक लोकांनी ‘होय’ असं उत्तर दिलं. या कार्यालयात फारसं कोणी दिसतच नाही. ते रिकामं असल्यामुळे मस्क यांनी असा प्रश्न विचारला होता. एखाद्या उद्योगपतीनं अशा प्रकारची चाचणी घ्यावी, हीच मुळी आपल्यासारख्यांना आश्चर्यकारक वाटण्यासारखी बाब आहे. ट्विटर ही कंपनी विशिष्ट विचारसरणीला समर्थन देते, अशी टीका यापूर्वीही झाली आहे. दुसरीकडे मुक्तपणे बोलण्याचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार असल्याचं मस्क यांचं मत आहे. त्यांनी घेतलेल्या जनमत चाचणीत 73 टक्के लोकांनी ‘ट्विटरवर संपादनाचा पर्याय हवा’, असं मत व्यक्त केलं. आता मस्क हे ट्विटरच्या संचालक मंडळात सहभागीच होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे ट्विटरमध्ये मतभेद होण्याची शक्यता राहणार नाही. सहाजिकच त्यामुळे ट्विटरची धोरणं बदलण्याची चिन्हं दिसत नाहीत. भारतातच नव्हे तर जगातच संदेश आदानप्रदानाचं सर्वात प्रभावी समाजमाध्यम म्हणून व्हॉट्स अॅपचं नाव घेतलं जातं. याच्या अर्थव्यवहाराची एक बाजू असलेल्या ‘व्हॉट्स अप पे’च्या पाच ते सहा कोटी वापरकर्त्यांना यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) प्रणालीशीजोडण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अलिकडेच परवानगी दिली. यामुळे व्हॉटस अॅपच्या वापरकर्त्यांचा डिजिटल व्यासपीठाच्या व्यवहारातला प्रवेश सुलभ होणार आहे. दुसरी बाब म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडून व्हॉट्स अप पे ला तिच्या चार कोटी वापरकर्त्यांना डिजिटल देयक सेवा देण्याची मुभा दिली गेली होती. आता नवीन सहा कोटी वापरकर्त्यांना युपीआय प्रणालीशी जोडण्याची मान्यता मिळाल्यामुळे तिच्या वापरकर्त्यांची एकूण संख्या दहा कोटीपर्यंत पोहोचणार आहे. यावरुन या व्यवसायाची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात यावं. त्या अनुषंगाने मस्क ट्विटरची काही योजना आखू शकतात. मस्क यांनी ट्विटरशी संबंध जोडण्याचा विचार केल्यामुळे त्यांच्या मूळ व्यवसायालाही मोठी चालना मिळणार आहे. आज जगातल्या सर्व प्रमुख उद्योगपतींची संख्या लक्षात घेतली असता बहुतेकांनी आपल्या उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर केल्याचं आढळतं. या दृष्टीनेही मस्क यांनी अत्यंत दूरदृष्टीनं विचार केला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
