अरे बापरे! मस्ककडून भारतातील ट्विटरच्या कर्मचार्‍यांची हकालपट्टी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ट्विटरची मालकी इलोन मस्क यांच्याकडे गेली, तेव्हापासून कंपनीत अनेक बदल झाले. ट्विटरने 4 नोव्हेंबर रोजी भारतातील बहुतांश कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि इंजिनीअरिंग विभागातील मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना कामावरून काढले आहे. त्याचबरोबर इतर अनेक विभागांमध्येही फेरबदल करण्यात येत आहेत. कंपनीने लोकांची कशी वर्गवारी केली असून त्याबाबत कंपनीने कर्मचार्‍यांना एक मेलही पाठवला आहे.

कंपनीने कर्मचार्‍यांना पहाटे 4 वाजता एक मेल केला आहे. ट्विटरला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी ग्लोबल वर्कफोर्सला कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाणार आहोत. कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसोबतच ट्विटर सिस्टम आणि युझर डेटासाठी सर्व ऑफिसेस तात्पुरत्या स्वरुपात बंद करू. जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा जात असाल तर कृपया आपल्या घरी जा, असे या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि काही अन्य वरिष्ठ कर्मचार्‍यांना मस्क यांनी कामावरून कमी केले होते. त्यानंतर आता मस्क यांनी संपूर्ण कर्मचार्‍यांनाच कमी करण्यासाठी एक मोहीम सुरू केल्याचे दिसत आहे. भारतातील कर्मचारी कपात हा याचाच एक भाग आहे. भारतात ट्विटरचे 300 कर्मचारी आहेत आणि सर्व कार्यालयातील जवळपास 250 कर्मचार्‍यांना मस्क यांनी कामावरून काढून टाकले आहे. यानंतर आता मस्क आणखी काय बदल करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Exit mobile version