। अलिबाग । प्रतिनिधी ।
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात अलिबागमधील मुस्लीम समाजाने संताप व्यक्त केला. पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत रविवारी (दि.27) अलिबागमधील सर्व मुस्लीम समाजाने एकत्र येऊन निषेध व्यक्त केला.
जम्मू-काश्मीर येथे फिरण्यास गेलेल्या पर्यटकांवर 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात रायगडसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन घाटीमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध अलिबागमधील मुस्लीम बांधवांनी केला आहे. अलिबागमधील बाजारपेठेतील जामा मशिदीसमोर सर्व मुस्लीम समाज मोठ्या संख्येने एकत्र आला. त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन हल्ल्याचा निषेध नोंदविला. दरम्यान, मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी नसीम बुकबाइंदडर, वसीम साखरकर, अश्रफ घट्टे, मुश्ताक घट्टे, जाफर सय्यद, फरीद सय्यद, अलिबागचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.
मुस्लीम समाजाकडून हल्ल्याचा निषेध
