हिंदूंच्या रक्षणासाठी मुस्लिम रस्त्यावर

। ठाणे । प्रतिनिधी ।

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बुधवारी (दि.11) मुंब्रा येथील दारूल फलाह मशिदीसमोर मुस्लीम बांधवांकडून निषेध आंदोलन करण्यात आले होते. बांगलादेश येथील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेश युनिस सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्य समुदाय, विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर हिंसा उफाळून आली. कट्टरपंथीयांनी हिंदूंवर अत्याचार करण्यास सुरूवात केली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मौलाना अब्दुल वहाब, मौलाना एहसान, मौलाना अय्याज, शाहरूख सय्यद, कादीर मेमन, सहार युनीस शेख यांच्यासह मुंब्रा-कौसा येथील मौलवी, मुस्लीम बांधवांनी निदर्शने केली. यावेळी ‘हिंदू बांधवांचे रक्षण करा’, असे फलक झळकवित आंदोलकांनी बांगलादेश सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

Exit mobile version