उन्हाच्या झळांनी मुके प्राणी व्याकुळ

| उरण | प्रतिनिधी |

एप्रिल महिन्यातच उन्हाने विक्राळ रूप धारण केल्याने माणसांसह मुके प्राणीही प्रचंड त्रस्त झाल्याचे हृदयस्पर्शी चित्र उरणमध्ये पाहायला मिळत आहे. मे-जूनची चाहूल लागण्याआधीच सूर्यदेव आग ओकत असल्याने उष्णतेचा कडेलोट झाला आहे. माणूस एसी, कूलर आणि थंड पेयांच्या आधारे काहीसा दिलासा मिळवतो; मात्र मुक्या प्राण्यांकडे अशा कोणत्याही सुविधा नसल्याने त्यांना उष्णतेची तीव्र झळ सहन करावी लागत आहे. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे, कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या एका माकडाने प्रचंड उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाटलीतून पाणी पित जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. हे दृश्य पाहून नागरिकही काही काळ स्तब्ध झाले. दरम्यान, या घटनेमुळे वाढत्या उष्णतेचा मुक्या प्राण्यांवर होणारा परिणाम अधोरेखित झाला असून, नागरिकांनीही अशा प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी, असा संदेश या घटनेतून समोर येत आहे.

Exit mobile version