| विश्वनाथ पंडित |
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही सिंधुताई यांची जन्मभूमी. त्यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवर्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत 1 हजार 50 मुले या राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यात बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थामधून हजारो अनाथ मुले,मुली वास्तव्य करुन असून त्यांचे संगोपन करण्यापासून शिक्षण देऊन उच्चशिक्षितही करण्यातही सिंंधुताईंचा मोठा वाटा होता.आज विविध क्षेत्रात त्यांच्या आश्रमातील शेकडो मुले, मुली उच्च पदावर कार्यरत आहेत.
स्वतःचा संसार राहिला नाही, अगदी रस्त्यावर यावं लागलं, जीवन अंधारात चाचपण्यांसाठी सुद्धा ना कसला आधार, ना साद, सोबत अशा खडतर प्रसंगी एका आईचं काळीज आपलं दुःख बाजूला सारून त्याही स्थितीत मला निराधार बालकांची आई व्हायचंय हा स्वतःच्या वेदनेतून एक निर्धार जन्म घेतो आणि एक वसा म्हणून जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सांभाळला जातो, जपला जातो तेव्हा म्हणावसं वाटतं की परमेश्वर देखील आव्हानांना सामोरे जाणारी खास माणसं जन्मास घालतो व आपले काम त्यांच्याकडून घडवून घेतो, त्यातील एक अनाथांची माय, महाराष्ट्राची माई, हजारहुन नातवंडांची आजी, निराधारांची मायमाऊली सिंधुताई सपकाळ यांचं जाण मनाला वेदना देऊन गेलं. ही समाजहानी न भरुन येणारी फार मोठी आहे. दुर्दम इच्छाशक्ती, उदंड कार्यशक्ती, अविश्रांत मेहनत, सेवेतील उत्साह आणि सदा स्मितहास्य असणार्या माईंनी निराधार बालकांचे संसार फुलवले, उभे केले. आपल्या जीवन संघर्षातून ममतेचा़, ममत्वाचा हिमालय उभा केला हे कधी काळालाही विसरता येणे शक्य नाही. निराधार, अनाथ बालकांसाठी अख्खं जीवन एक सेवाव्रती भावनेने, ईश्वराचे काम समजून जीवनभर केले, केवळ आजची निराधार बालक भविष्यात निराधार म्हणून जगू नये नयेत नव्हे तर तीही समाजाचा आधार व्हावीत या आणि याच केवळ स्वप्नासाठी आणि त्यानी यशस्वीही केलं. अशी माऊली पुन्हा होणे नाही. त्यांना सातशे पन्नासवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. स्वतः जगताना दुसर्यासाठी ही जगावं, समाजातील सुखदुःख आपलीच समजावी ही शिकवण, ती प्रेरणा, ते व्रत अनाथांची माय समाजाला देऊन गेलीय. मातोश्री सिंधुताईंचे समाजाप्रती योगदान, त्यांचं कार्य पिढ्यानपिढ्या मार्गदर्शनपर राहील. माउलीला भावपूर्ण आदरांजली.
म्हणून माईचा दफनविधी
‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या व तसं जीवन प्रत्यक्ष जगलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावर बुधवारी दुपारी पुण्यातील नवी पेठ येथील ठोसरपागा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्निसंस्काराऐवजी त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. सिंधुताईचे अंत्यसंस्कार दफनविधी पद्धतीनं का करण्यात आले याची सध्या चर्चा आहे. याबाबतची माहिती ताईंच्याच संस्थेतील पदाधिकार्यांनी दिली. त्यानुसार, सिंधुताई सपकाळ यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली होती. त्या पंथामध्ये मृत्यूनंतर दफन करण्याची प्रथा आहे. या पंथाच्या रूढीपरंपरेनुसारच आपले अंत्यसंस्कार व्हावेत, अशी सिंधुताईंची इच्छा होती. त्यामुळंच त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुताईंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिंधुताईंना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्ययात्रेच्या दरम्यान श्री चक्रधर स्वामींच्या नावाचा जप सुरू होता. तसंच, श्रीमद्भगवतगीतेच्या श्लोकांचंही उच्चारण करण्यात आलं. सिंधुताईंना निरोप देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.