शाळेच्या छतावर भाजीपाल्याची लागवड
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मानिवली शाळेच्या छतावर भाजीपाल्याची बाग फुलली आहे. विद्यार्थ्यांनी श्रमदान करून भाजीपाला लावण्यासाठी कुंड्या आणल्या आणि त्यात भाजीपाल्याची रोपे तयार केली. साधारण जुलै महिन्यात हाती घेतलेला हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यामुळे ‘माझी शाळा, माझी परसबाग’ अंतर्गत यशस्वी ठरलेला हा उपक्रम कुतूहलाचा विषय बनला आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानामुळे अनेक शाळा नवनवीन उपक्रम आपल्या शाळेत राबवत असतात. मानिवली येथील इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंत शिक्षण दिल्या जाणाऱ्या शाळेला ‘उपक्रमशाही शाळा’ म्हणून ओळखले जात आहे. या शाळेकडून राबविल्या जाणाऱ्या एका उपक्रमात ‘माझा वाढदिवस माझे झाड’ या अंतर्गत चिमुकल्यांनी स्वतःच्या वाढदिवसाला आपल्या शाळेसाठी कुंडी सहित एक झाड भेट दिले. त्यातून शाळेची फिरती बाग तयार झाली. या उपक्रमाचा पुढील अध्याय म्हणून ‘माझी शाळा माझी परसबाग’ हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक परशुराम राठोड, सहशिक्षिका सुनंदा पाटील, संज्योती कांबरी, अनिता कडलग व रोहिणी राहिंज यांनी पुढाकार घेतला. या शाळेत जागे अभावी परसबाग तयार करता येत नव्हती. त्यामुळे ग्रो बॅगचा वापर करून परसबाग फुलविण्यात आली. या बॅगा शाळेला नेहमी भेट देणाऱ्या पक्षी प्रेमी आणि पक्षी निरीक्षक मृणाल घोसाळकर यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर सर्व बॅगा शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यात बीया पेरून रोपे तयार करण्यात आली. आता ही परसबाग शाळेच्या टेरेसवर फुलली आहे.
स्वकृती निर्मिती अनुभव
जागे अभावी शाळेच्या टेरेसवर परसबाग फुलवण्यात आली. या बागेत कोबी, वांगी, पालक, कोथिंबीर, मुळा, मेथी या भाज्या तसेच वेगवगेळी प्रकारची फुले फुलली आहेत. त्यात गुलाब, गोकर्ण, अबोली, सदाफुली, चिनी गुलाब अशी मन प्रसन्न करणारी झाडे लावण्यात आली आहेत. मुलांना पेरलेले बी उगवताना पाहाण्यात खूप मजा वाटत आहे. त्यामुळे मुलांना एक स्वकृती निर्मिती अनुभव मिळत आहे. हे पाहून सर्व शिक्षकांनाही खूपच आनंद वाटत आहे.
परसबाग तयार करण्यासाठी शाळेच्या आजूबाजूला जागा उपलब्ध नव्हती. त्यावेळी पुणे-मुंबई सारख्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात इमारतींच्या टेरेसवर परसबाग फुलविल्याचे आमच्या शिक्षकांनी वाचले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या बिया गोळा करण्याच्या आवडीला छतावरील परसबागेच्या जोड दिली. या परसबागेसाठी काही रोप, बियाणे नर्सरीतून आणली तर काही बियाणे विकत घेतले. पालापाचोळा आणि शेणखत झाडांना लागणारे खत नर्सरीतून घेतले. जुलै महिन्यात सुरु झालेला हा उपक्रम यशस्वी झाला असून विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात विशेष आनंद घेतला. अनेक विद्यार्थी शाळेत आल्यावर त्या झाडणाच्या आजूबाजूला फिरताना दिसतात आणि आनंद घेतात. हे पाहून आनंद वाटतो.
परशुराम राठोड,
मुख्याध्यापक







