उपोषणाला माझा पाठिंबा; आ.शेखर निकम


पूरमुक्त चिपळूणसाठी बचाव समितीचे साखळी उपोषण सुरू
चिपळूणवासीयांचा उदंड सहभाग
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
महापुरात उद्वस्त झालेल्या कोकणाला पूर्ववत करण्यासाठी अद्यापही राज्यकर्त्यांकडून कोणतीही ठाम भूमिका घेण्यात आली नाही. त्यात आजही चिपळूणला पूराचा धोका आहे. यामुळे नागरिकांचा उदंड सहभाग मिळत असलेल्या पूरमुक्त चिपळूणसाठी बचाव समितीमार्फत आयोजित साखळी उपोषणाला माझा पाठिंबा आहे. भलेत माझी आमदारकी गेली तरी मला चिंता नाही, अशा शब्दांत आ.शेखर निकम यांनी आयोजित जनआंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.
जुलै महिन्यात आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी नदीचा गाळ काढणे, हा त्यावरील मुख्य पर्याय आहे. यासाठी चिपळूण बचाव समितीने विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत.
यामध्ये वाशिष्ठी व तिच्या उपनद्या उगमस्थानापासून मुखापर्यंत गाळ काढणे करीता आवश्यक अध्यादेश काढून आर्थिक नियोजन करणे, चिपळूण व परिसराला उध्वस्त करणारी लाल आणि निळी रेषा रद्द करा, नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्यक्ष गाळ काढण्यास सुरुवात करा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, यास शासन वा प्रशासनाकडून आवश्यक तो प्रतिसाद लाभला नसल्याचे चित्र आहे.
याच पार्श्‍वभूमीवर चिपळूण बचाव समितीने प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यानिमित्त येथील बाजारपेठ बंद ठेवून व्यापार्‍यांनीही शेकडोंच्या संख्येने सहभाग घेतला आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा पुन्हा एकदा समितीने दिला आहे.
या आंदोलनकर्त्यांची आमदार शेखर निकम यांनी भेट घेतली आहे. याप्रसंगी आपल्या मनोगतात निकम म्हणाले की, महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी जितके प्रेम पश्‍चिम महाराष्ट्रावर दाखवले आहे, त्याच्या तुलनेत कोकणाला आजही दुजाभाव दिला गेल्याचे चिन्ह आहे. चिपळूण व परिसरातील गावे पूरमुक्त होण्यासाठी डझनभर मंत्र्यांना भेटलो. त्यांना निवेदन देत चर्चा केली, त्याचा पाठपुरावाही नेमाने सुरू आहे. मात्र, यात पाहिजे तसे यश येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच नागरिकांनी सुरू केलेल्या उपोषणाला माझाही पाठिंबा आहे. यावर कारवाई झाली तरी चालेल, मला आमदारकीची चिंता नाही. गाळ काढण्यासाठीच्या लढ्यात मी नेहमीच सोबत राहीन, असा विश्‍वास आमदार शेखर निकम यांनी साखळी उपोषणात दिला.

महापुराबाबत प्रशासनाने काहीही सांगितले तरी पूर कसा आला, धरणातून पाणी सोडले की नाही, या सर्व बाबींची माहिती नागरिकांना आहे. महापूर पुन्हा येऊ नये, यासाठी जंगलतोड थांबवायला हवी, धरणातील गाळ काढायला हवा. – आ.शेखर निकम, चिपळूण

Exit mobile version