। पनवेल । वार्ताहर ।
राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणार्या माझी वसुंधरा 4.0 या अभियानात पनवेल महानगरपालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. 3 लक्ष ते 10 लक्ष लोकसंख्या श्रेणीत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल पनवेल पालिकेस 7 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार असून त्याचे वितरण लवकरच होणार आहे.
राज्य शासनाच्यावतीने पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, यासाठी माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा चौथा टप्पा सुरु असून यात पनवेल पालिकेने सहभाग नोंदवला होता. सहभाग नोंदवल्यानंतर पर्यावरण पुरक प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. याचबरोबर शहरातील वातावरणातील प्रदुषण पातळी कमी करण्यासाठीचे उपक्रम राबवत पनवेल शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, संगोपनाचे काम हाती घेतले होते.या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे राज्य शासनाच्यावतीने मूल्यांकन करण्यात आले होते. यानुसार माझी वसुंधरा अभियान 4.0 चा निकाल शासनाच्यावतीने जाहीर केला. 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या निकषात या गटात पनवेलसह इतर पालिकांचा सहभाग होता. यात पनवेल पालिकेने बाजी मारत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवला. अभियानातील पहिल्या क्रमांकाबद्दल पनवेल पालिकेस सात कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे.