रहस्य लेखक गुरुनाथ नाईक यांचे निधन

पुणे | प्रतिनिधी |
मराठी साहित्य क्षेत्रात जागतिक विक्रम करणारे आणि बाराशे मराठी कादंबर्‍या लिहिणारे प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे पुण्यामध्ये निधन झाले.
गुरुनाथ नाईक हे मराठीतील आघाडीचे रहस्य कथाकार होते. मुंबई पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे होते. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होय.
प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक कीर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर हे नाईक यांच्या वडिलांचे -विष्णू नाईक- यांचे जवळचे मित्र. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच गुरुनाथ नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रुजले. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्‍वभूमी आहे. साखळीच्या राणे घराण्याने पोर्तुगीजांविरुद्ध 17 बंडे पुकारली होती. नाईक यांचे आजोबा लेफ्टनंट होते. 1901 मध्ये त्यांनी बंड पुकारले.
रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे 1957 ते 1963 या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या.

Exit mobile version