नागपंचमी भक्तिमय वातावरणात साजरी

| म्हसळा | प्रतिनिधी |

नागपंचमी आणि पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून परिसरातील शिवमंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली होती. हर हर महादेव, ॐ नमः शिवायच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

या पवित्र दिवशी भगवान शंकराला एक हजार बेलपानांसह अभिषेक करण्यात आला. विधिवत पूजा-अर्चा, रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक तसेच बेलपत्र अर्पण करून महादेवाची आराधना करण्यात आली. यावेळी भाविकांनी श्रद्धेने बेलपान, फुले, दूध, फळे व नैवेद्य अर्पण करून भगवान शंकराचे दर्शन घेतले.
नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेचे पूजनही करण्यात आले. नागपंचमी आणि श्रावण सोमवार हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जात असल्याने महिला, पुरुष तसेच लहान मुलांनी मोठ्या श्रद्धेने पूजाविधीत सहभाग घेतला.

मंदिरात भक्तिगीते, भजन आणि मंत्रोच्चार सुरू होते. भाविकांनी उपवास करून भगवान शंकराची मनोभावे पूजा केली. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.एक हजार बेलपानांचा अभिषेक हा या धार्मिक सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरला. महादेवाला बेलपत्र अर्पण करताना भाविकांनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि सर्वांच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला भगवान शंकराच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पहिल्याच श्रावणी सोमवारला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक परंपरा जपत महादेवाचे दर्शन घेतले. या संपूर्ण सोहळ्यामुळे परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Exit mobile version