| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील नागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या साडेपाच महिन्यांपासून विनाशिक्षक असल्याने अत्यंत दयनीय अवस्थेत होती. शाळेत विद्यार्थी उपस्थित असतानाही त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या परिस्थितीमुळे शाळेचे अस्तित्वही धोक्यात आले होते. मात्र, आता या शाळेला तात्पुरता शिक्षक मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.
शिक्षक नसल्याने शाळेची इमारत केवळ चार भिंतींमध्ये मर्यादित झाली होती. विद्यार्थ्यांचे हसरे चेहरेही निराश झाले होते. अशा कठीण परिस्थितीत नागाव केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून डॉ. संदीप वारगे यांनी पदभार स्वीकारत शाळा वाचवण्याचा निर्धार केला. शिक्षणाविषयी असलेली त्यांची बांधिलकी आणि तळमळ यामुळे त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॉ. वारगे यांनी ग्रामस्थ, ग्रामपंचायत नागाव तसेच पंचायत समिती प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे पंचायत समिती प्रशासनाने शाळेसाठी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आलेली ही शाळा पुन्हा सुरू करण्यास यश आले आहे.
या प्रक्रियेत गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. समायोजन प्रक्रियेनंतर शाळेला पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे शाळेच्या भवितव्याबाबत आता सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. नागाव परिसरातील अनेक विद्यार्थी हे गरीब, कामगार व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांतील आहेत. काही विद्यार्थी परगावाहून येथे शिक्षणासाठी येतात आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही अत्यंत कठीण आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ही शाळाच शिक्षणाचा एकमेव आधार होती. शिक्षक नसल्यास त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली असती. मात्र, डॉ. वारगे यांच्या प्रयत्नांमुळे ही परिस्थिती बदलली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.







