दोन वर्षे काम ठप्प, पंचक्रोशीत उन्हाळ्यात पाणीटंचाई
माती भराव गेला वाहून; दोन वर्षांत एक थेंबही नाही
| दिघी | गणेश प्रभाळे |
श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथील साठवण तलाव प्रकल्प हा शासनाच्या नियोजनशून्यतेचा आणि निष्क्रियतेचा जिवंत नमुना ठरला असून, उद्घाटनानंतर तब्बल दोन वर्षे उलटूनही प्रकल्प ठप्पच आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या पदरी एक थेंब पाणी पडलेले नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
2011 मध्ये मंजुरी, 2012 मध्ये कामादेश आणि मार्च 2023 मध्ये मोठ्या गाजावाजात उद्घाटन एवढ्या टप्प्यांनंतरही प्रत्यक्षात प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहे. सुमारे 6.37 कोटींच्या या योजनेत 290 मीटर लांबीचे व 27.20 मीटर उंचीचे धरण उभारून 105 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे स्वप्न दाखविण्यात आले होते. मात्र, आज त्याठिकाणी विकासाऐवजी निष्क्रियतेचेच चित्र दिसत आहे. उद्घाटनानंतर 2023-24 मध्ये सुरू झालेले कॅनॉल व दगडी बांधकाम पावसाच्या पहिल्याच फटक्यात वाहून गेले. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आधीच खर्च केलेला निधी पाण्यात गेला असून, आता प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा कोट्यवधी रुपयांची मागणी पुढे आली आहे.
उन्हाळ्यात नागलोलीसह कासारकोंड, नवीवाडी, बोर्ला, वावे धनगरमलाई इत्यादी गावांतील शेतकरी आणि नागरिक अक्षरशः पाण्यासाठी हवालदिल होतात. टँकरने पाणी आणण्याची वेळ आली येते. शेती कोरडी पडली, उत्पन्न घसरले, कर्जबाजारीपणा वाढला, तरीही प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महिलांना तासन्तास पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असून, लहान मुलांनाही पाणी भरण्याच्या कामात ओढले जात आहे. ‘उद्घाटन झाले, पण पाणी नाही’ अशी संतप्त भावना पंचक्रोशीत उमटत आहे.
विशेष म्हणजे, भूसंपादन व अन्य प्रक्रिया पूर्ण असतानाही निधीअभावी काम थांबले आहे. जलसंधारण महामंडळ व संबंधित विभागांकडून केवळ कागदी हालचाली होत असल्याचा आरोप असून, कंत्राटदाराने अर्धवट काम सोडल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
घटनाक्रम
2010: तांत्रिक मान्यता (रु.5.64 कोटी).
2011: प्रशासकीय मान्यता (रु.6.37 कोटी).
2012: भाग्यश्री कन्स्ट्रक्शनला कामादेश.
2020: वनजमीन मान्यता.
2023: भूमीपूजन, पण पावसात भराव वाहून गेला.
2024 पासून काम ठप्प.
धरण होणार म्हणून, आम्ही ग्रामस्थ आनंदी आहोत. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. शासनाने तात्काळ लक्ष देऊ निधी उपलब्ध करून धरणाचे काम सुरु करणे आवश्यक आहे.
– जयेश जाधव, नागलोली ग्रामस्थ
नागलोली साठवण तलावासाठी आम्ही सुधारित प्रकल्प शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे व सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
– मंगेश साठे, उपअभियंता, जलसंधारण विभाग
