नागोठणे एस.टी स्थानकातील वेळापत्रक झाले कालबाह्य

| नागोठणे | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील महत्वाचे व मध्यवर्ती स्थानक असलेल्या नागोठणे एस.टी.स्थानकातील येणाऱ्या-जाणाऱ्या एस.टी. बसेसचे वेळापत्रक कालबाह्य झाले आहे. या वेळापत्रकातील अनेक एस.टी. बसेस बंद झाल्या असून काही बसेसच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. मात्र असे असूनही स्थानकात सुधारित वेळापत्रक लावण्यात न आल्याने प्रवाशांच्या मनात गोंधळ निर्माण होऊन दिशाभूल होत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नागोठणे हे मध्यवर्ती स्थानक असल्याने नागोठणे स्थानकांतून सकाळी साडेपाच वाजल्या पासून सुरु होणारी एस.टी. बसेसची वाहतुक रात्री दहा वाजेपर्यंत सुरु असते. या दरम्यान दिवसभरात विविध ठिकाणी जाणाऱ्या-येणा-या सुमारे दोनशे बसेस या स्थानकातून ये-जा करीत असतात. त्यामुळे या स्थानकाचा कारभार दोन पाळ्यांमध्ये दोन वाहतुक नियंत्रक चालवीत आहेत. नागोठणे एस.टी.स्थानकात माणगाव, महाड, रोहा, पेण, मुरूड, पोलादपूर, श्रीवर्धन यांसह इतर अनेक आगाराच्या एस,टी. बसेस येत असतात. या बसेसची नोंद नागोठणे स्थानकात करण्यात येत असते. या स्थानकातून ये-जा करणा-या एस.टी. बसेसच्या वेळांची नोंद या स्थानकातील वेळापत्रकावर करण्यात आली आहे. नागोठणे एस.टी. स्थानकातील हेच वेळापत्रक दि. 17 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर या स्थानकातून ये-जा करणा-या अनेक एस.टी. बसेसच्या वेळांत बदल झाला असून अनेक गाड्या बंद वा नव्याने सुरु करण्यात आल्याने त्याची नोंद या वेळापत्रकावर नाही. त्यामुळे हे वेळापत्रक तातडीने अद्ययावत करण्यात यावे ही मागणी प्रवाशांतुन करण्यात येत आहे.

‘नागोठणे एस.टी. स्थानकातील वेळापत्रक अद्ययावत करण्यासंदर्भात सर्व गाड्यांच्या वेळांची माहिती तातडीने रोहा आगारात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर रोहा आगारातून हे सुधारित वेळापत्रक तयार करुन आल्यानंतर ते लगेच नागोठणे एस.टी. स्थानकात लावण्यात येईल.’

प्रसाद पाटील,
वाहतूक नियंत्रक, नागोठणे एस.टी.स्थानक

Exit mobile version