पुलाच्या कठड्याच्या दुरुस्तीचे कामही पूर्ण
| नागोठणे | महेश पवार |
नागोठणे व वरवठणे गावांना जोडणाऱ्या तसेच अनेक गावे व आदिवासी वाड्या यांना येण्या जाण्यासाठी महत्वाचा दुवा असलेला नागोठणे वरवठणे हा मुघलकालीन ऐतिहासिक पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र, या पुलावरून दररोज ये- जा करणाऱ्या वरवठणे ग्रामस्थांचे होणारे हाल व दुचाकीस्वारांची अडचण लक्षात घेऊन तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार हा पूल दोन दिवसांपूर्वी पादचारी व दुचाकी स्वारांसाठी शासनाच्या बांधकाम खात्याकडून अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे.
नागोठण्यातील हा मुघलकालीन पूल अरुंद व कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सदर पुलावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेनुसार पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेड्स आणि सूचना फलकही लावण्यात आले होते.
सदर रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात आल्याने नागरिकांसाठी वरवठणे आंबेघर फाटा रिलायन्स चौक नागोठणे हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, वरवठणे गावाहून नोकरी व्यवसायानिमित्त, नागोठण्यात खरेदीसाठी दररोज ये- जा करणाऱ्या पादचारी नागरिकांना व दुचाकी स्वारांना 3 ते 4 किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. तसेच येथील अंबा नदीला नुकत्याच आलेल्या पुराच्या जोरदार प्रवाहामुळे या पुलाच्या कठड्याचीही पडझड झाली होती. त्यामुळे पडझड झालेल्या कठड्याचे काम सुरू करून किमान पादचारी व मोटारसायकल जाईल एवढी जागा सोडावी अशी जोरदार मागणी वरवठणे मधील ग्रामस्थांनी व दुचाकी वाहनचालकांनी शासनाकडे केली होती. आता पुलाच्या दोन्ही बाजूला कठड्याचे बांधकाम करून, पादचाऱ्यांना येण्या जाण्यासाठी सोयीचे होईल व दुचाकी जाईल एवढीच मोकळी जागा सोडण्यात आली आहे. याशिवाय नुकत्याच आलेल्या पुरामुळे उध्वस्त झालेला कठडाही बांधण्यात आल्यानंतर हा पूल सुरू करण्यात आल्याने पादचाऱ्यांबरोबरच दुचाकीस्वारांचाही हेलपाटा वाचणार आहे. त्यामुळे पादचारी व दुचाकीस्वार सुखावले आहेत.