। पेण । वार्ताहर ।
चिरनेर जंगल सत्याग्रहातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी हे आदिवासींच्या अस्मितेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत शेतकरी, कामगार, आदिवासींचा प्रमुख सहभाग होता. सह्याद्रीच्या दर्याखोर्यात त्याकाळी राहणार्या कातकरी समाजाला सामाजिक स्वीकृती नव्हती तसेच प्रतिष्ठाही नव्हती. आजही त्याकरिता संघर्ष करावा लागत आहे, असे उद्गार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी काढले आहेत. त्या अंकुर ट्रस्ट संस्थेच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होत्या. या बैठकीत पेण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला हुतात्मा नाग्या महादू कातकरीचे नाव देण्याचा महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी अंकुर ट्रस्ट आदिवासी संघटनेच्या गावपातळीवरील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व आदिवासी शालेय विद्यार्थी उपस्थित होते. याबाबत शिक्षित आदिवासी युवकांनी आनंद व्यक्त करून आदिवासींच्या अस्मितेच्या चळवळीची दखल शासनाने घेतल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.







