समृद्धी महामार्गावर ठोकले शेकडो खिळे; मध्यरात्री पंक्चर गाड्यांची रीघ

। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।

समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा नागपूरकडून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान अनेक लोकांनी गाड्या थांबवल्यानंतर तपासणी केली असता असं लक्षात आलं की ब्रिजवर शेकडो विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकल्याचे आढळून आले.

छत्रपती संभाजीनगरजवळच्या सांगवी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान दौलताबादजवळ रस्त्यावर शेकडो खिळे ठोकले होते. यामुळेच वाहनांचे टायर फुटत होते. कुणी चोरट्याने हे खिळे ठोकले असावे आणि गाड्या पंक्चर झाल्यानंतर त्यांना लुटण्याचा त्यांचा हा डाव असावा, असे प्रथमदर्शनी लोकांना वाटले होते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच होती. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या प्रकारानंतर, पुलाच्या कामासाठी खिळे ठोकण्यात आले होते, तर अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी बॅरिकेट्स का लावले नाहीत? असा संतप्त सवाल वाहन चालकांनी केला आहे.

दरम्यान, वाहनधारकांनी घटनास्थळाचे व्हिडीओ काढून व्हायरल केले आहेत. यात रस्त्याच्या मधोमध शेकडो खिळे ठोकल्याचे यात स्पष्ट दिसत आहे. धक्कादायक म्हणजे रस्त्याच्या कामासाठी हे खिळे ठोकण्यात आले होते आणि याबाबत कोणतीही सूचना देण्यात नव्हती किंवा सदर ठिकाणी बॅरिकेट्सही लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज आला नाही आणि वाहनांचे टायर पंक्चर झाले. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. सोबतच यामुळे कुणाचा अपघात होऊन प्राण गेले असते तर त्याला जवाबदार कोण? समृद्धी महामार्गावरून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या या मनस्तापालाही जबाबदार कोण?, असे एक ना अनेक प्रश्न वाहन चालकांकडून विचारले जात आहेत.

Exit mobile version