प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक; सरकारविरोधात लवकरच उभारणार लढा
। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
नैना प्रकल्पाबाबत राज्य शासन आणि सिडको शेतकर्यांची करोडो रुपयांची जमिन कवडीमोल किंमतीत घेऊन शेतकर्यांची फसवणूक करीत आहे. नैना प्रकल्पाची भूमिका चुकिची आहे. या अधिवेशनात नैनाचा प्रश्न मांडणार असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आ. जयंत पाटील यांनी दिला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि.3) नैना प्रकल्पबाधित शेतकर्यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आ. बाळाराम पाटिल, जे.एम. म्हात्रे, जी.आर. पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, राजेश केणी, गणेश कडु, नामदेव फडके, वामन शेळके, बाळाराम फडके, राजेश केणी, सुभाष भोपी, बबन फडके, विलास फडके, शेखर शेळके, डि.के. भोपी, राज पाटील, गजानन पाटील, अनिल ढवळे, मोहन भोपी, रामचंद्र फुलोरे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र भोपी यांनी केले.
यापुढे मार्गदर्शन करताना, अधिवेशनात नैनाचा विषय कसा मांडायचा, याची माहिती घेण्यासाठी पनवलेमध्ये आल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. तज्ज्ञांकडून माहिती घेऊन योग्यरितीने प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यापुर्वी शेतकर्यांकडून अनेक चुका झाल्या. मात्र चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी प्रत्येक शेतकर्याने घेतली पाहिजे. जनतेने तसेच युवा पिढीने जागरुक राहणे गरजेचे आहे. कारण नैनाला बुडविण्याची ताकद पनवेलच्या शेतकर्यांमध्ये आहे. मतासाठी नाही तर आपला शेतकरी मानाने जगला पाहिजे ही भुमिका ठेऊन काम करावे लागेल.
आंदोलन पैशाने होत नाही. शेतकर्यांच्या संघटनेमुळे शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा सरकारशी लढा यशस्वी ठरला. त्यामुळे पनवेलच्या शेतकर्यांनीही संघटित होणे गरजेचे आहे. पनवेलचे संघटित शेतकरी एकत्र झाले तर केवळ याच भागातील नाही तर संपूर्ण राज्यातील अन्यायकारक कायदे बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. या लढ्यात सरकार तसेच पोलीस यंत्रणा दडपशाही करीत असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल. नैना आम्हाला नको. नैना जो विकास करेल, तो आम्ही करु. सर्व शेतकर्यांनी व सर्व गावांनी एकत्र येत नैनाला विरोध करायचा आहे. नैनाला विरोध करण्यासाठी यापुढे मोठे आंदोलन लवकरच उभारू. त्यासाठी राजू शेट्टी यांच्यासह दिल्लीचे शेतकर्यांचे नेते राकेश टिकैत यांना देखील पनवेलला येण्याचे निमंत्रण देऊ, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. शेतकर्यांवर लादलेला नैना प्रकल्प किती अन्यायकारक आहे, याची माहिती आर्किटेक्चर अतुल म्हात्रे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे पडद्यावरती दाखविली.