नाका कामगार रोजगाराच्या शोधात

गवंडी, बिगारी, रंगारी, साफसफाई कामगारांवर उपासमारीची वेळ

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

कितीही आनंदाचा सण असो वा उत्सव मात्र समाजातील असेही काही घटक आहेत, त्यांना रोजच्या दैनंदिन रोजगाराची भ्रांत पडलेली असते. वर्षाचे बाराही महिने त्यांना दिवसाच्या रोजगारासाठी झटावे लागत आहे. सर्वजण दिवाळाचा आनंद अनुभवत असताना, नाका कामकागारांची सकाळ काम शोधण्यापासून सुरु होते. पाली सुधागडसह जिल्ह्यातील ठिकठिकाणी कामगार नाक्यावर सकाळी पहाटे कामगार येऊन बसलेले असतात; परंतु दुपार होऊनही या कामगारांना काम मिळत नाही. कोरोना काळात तर या कामगारांचे अतोनात हाल झाले होते.

हे नाका कामगार कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार येथून आलेले आहेत. गवंडी, बिगारी, रंगारी, साफसफाई आदी रोजंदारीवर हे कामगार कामे करतात. कामगार नाक्यावरील कामगारांची संख्या आणि त्यांना मिळणार्‍या कामावरुन त्या शहरातील बांधकाम क्षेत्राची प्रगती लक्षात येते. आता बांधकामासह इतर कामे मंदावल्यामुळे नाका कामगारांना हवे तसे काम मिळेनासे झाले आहे. मजुरीच्या दरात घट करुनही काम नसल्यामुळे नाक्यावरून निराश होऊन त्यांना माघारी परतावे लागत आहे. कोरोनाच्या दरम्यान सर्वाधिक फटका कुशल-अकुशल कामगारांना बसला. यातून हा घटक अद्याप सावरलेला नसल्याचे कामगार नाक्यावर होणार्‍या गर्दीवरुन दिसून येत आहे.

हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ या कामगारांवर ओढावणार असल्याचे एका कामगाराने सांगितले. पूर्वी सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत मजुरांना काम मिळत होते. आता दहा ते बारा वाजेपर्यंत त्यासाठी थांबावे लागते तरीही काम मिळण्याची शाश्‍वती नसते, असे गोरखपूर येथून आलेल्या विक्रम यादव या नाका कामगाराचे म्हणणे आहे. आठवड्यातून तीन-चार वेळाच काम मिळत आहे. त्यामुळे हातात पैसे राहात नाहीत. उसनवारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो, असे सुजल लोखंडे या कामगाराचे म्हणणे आहे.

पालीतील कृष्णा हा नाका कामगार सांगतो की, गावाकडे कामधंदा नसल्याने आम्ही नवरा-बायको येथे आलो, जेणेकरुन गावाकडे पैसे पाठवून मुलाबाळांना दिवाळी किमान साजरी करता येईल; परंतु तसे झाले नाही. या महिन्यात आतापर्यंत जेमतेम 12 दिवस रोजगार मिळाला.

काही मेहनतीची कामे करण्यासाठी स्थानिक कामगार मिळत नाहीत. यासाठी हे बाहेरुन कामगार आलेले असतात. परंतु, लांबलेला पावसाळा आणि नव्या बांधकामांना अद्याप वेग आलेला नसल्याने या कामगारांना पुरेसा रोजगार मिळू शकत नाही. यापूर्वी बांधलेली घरेच काही बांधकाम व्यावसायिकांना विकता आलेले नाही. या सर्व दृष्टचक्रात हे कष्टकरी आ़डकले आहेत.

नितीन वाघमारे
लेबर कॉन्ट्रक्टर
Exit mobile version