बोरघाटाला शिंग्रोबा धनगर नाव द्या

आ. महादेव जानकर यांची विधानसभेत मागणी

| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे जुन्या महामार्गवर असलेल्या बोरघाटाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ हे नाव द्या, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर यांनी विधानसभेत केली.देशावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा इंग्रज मुंबई-पुणे जोडण्यासाठी रस्ता काढायला कसा याचा विचार करून ते खोपोलीजवळील डोंगरात भटकत होते. त्यावेळी तेथे मेंढ्या चारत असलेल्या शिंग्रोबा धनगराने पाहिले व त्यांनी इंग्रजांना विचारले की काय इकडे तिकडे शोधताय? त्यावेळी इंग्रज बोलले की, आम्हाला या डोंगरातून रस्ता काढायचा आहे.

मात्र, तो काढायचा कसा हेच कळत नाही. त्यावेळी शिंग्रोबा बोलले की, मी तुम्हाला रस्ता दाखवतो, तुम्ही माझ्या मागे या. त्यावेळी शिंग्रोबाच्या मागे इंग्रज घाट चढून वरती आले व त्यांना समजले की आपण येथून रस्ता काढू. त्यावेळी इंग्रजांनी शिंग्रोबाला विचारले की, तुम्ही रस्ता दाखवल्याबदल इनाम म्हणून माग काहीतरी, त्यावेळी शिंग्रोबा धनगर बोलले की, मी धनाने धनगर आहे, मला काही द्यायचे असेल तर आमच्या देशाला स्वातंत्र्य द्या, हे शब्द इंग्रजांच्या कानावर पडताच त्या क्रूर अधिकार्‍यांनी त्या ठिकाणी शिंग्रोबाला गोळ्या घालून ठार मारले व त्या ठिकाणी इंग्रजांनी रस्ता तयार करून मुंबई-पुणे एकमेकांना जोडले गेले, तो आजचा बोरघाट.ज्या शिंग्रोबा धनगराला गोळ्या घातल्या त्याठिकाणी वीर हुतात्मा शिंग्रोवाचे मंदिर बांधले असून, आजही प्रत्येक वाहन त्याठिकाणाहून जातात क्षणभर शिंग्रोबा मंदिराजवळ वाहन थांबवून शिंग्रोबाला नमन करूनच पुढे जातो. त्या महान वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगराचे नाव हे बोरघाटाला द्यावे, अशी मागणी आ. महादेव जानकर यांनी केली.

Exit mobile version