राज्यातील खासदारांची संसद भवनाबाहेर निदर्शने
| उरण | प्रतिनिधी |
राजधानी दिल्लीतील संसद भवनाच्या आवारातच महाराष्ट्राच्या भूमीपुत्रांचा प्रचंड रोष उसळला आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्व. दि.बा. पाटील साहेबांचे नाव देण्यात यावे या ठाम, निर्विवाद मागणीसाठी बुधवारी (दि.10) निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातील खासदारांनी एकत्रितपणे दिल्लीच्या दारात उभे राहून केंद्र सरकारसमोर हा प्रश्न भक्कमपणे उभा केला.
या आंदोलनात खासदार सुरेश म्हात्रे (बाळू मामा), खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार दिना बामा पाटील यांच्यासह महाराष्ट्राचे अनेक खासदार ठामपणे उभे राहिले. भूमीपुत्रांच्या हक्कासाठी लढताना हे सर्व खासदार एकाच आवाजात, एकाच भूमिकेत, एकाच निर्धाराने केंद्र सरकारला संदेश देत होते. “दि.बा. पाटील यांचे नाव देणे हा उपकार नाही, हा आमचा हक्क आहे!” असेही यावेळी सरकारला ठणकावून सांगण्यात आले.
उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरातील हजारो कुटुंबांनी विमानतळासाठी दिलेल्या जमिनी, गमावलेली घरे-गावे, मोडलेल्या संसाराची कथा आज पुन्हा एकदा दिल्लीसमोर उभी राहिली. या सर्व त्यागाचा सन्मान म्हणून विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देणे ही भूमीपुत्रांच्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची आणि न्यायाची लढाई आहे. मागील अनेक वर्षांपासून हा संघर्ष सुरू असून, आजच्या आंदोलनाने त्याला नवी ऊर्जा मिळाली. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी केलेल्या एकमुखी आवाजाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, भूमीपुत्रांच्या प्रश्नावर महाराष्ट्र कधीही मागे हटणार नाही. केंद्र सरकारने तातडीने हा मुद्दा निर्णयप्रक्रियेत आणून भूमीपुत्रांचा मान राखावा, ही ठाम मागणी आजच्या निदर्शनांतून नोंदवण्यात आली.
संसद भवनाबाहेर घोषणा
‘दि.बा. पाटील साहेबांचा सन्मान अबाधित ठेवा!', ‘भूमीपुत्रांचा अपमान सहन करणार नाही!' या घोषणांनी वातावरण क्षणभर ढवळून निघाले आणि दिल्लीने स्पष्टपणे हा रोष, हा आक्रोश आणि हा निर्धार ऐकला.







