रेल्वे स्थानकांची नावे बदलणार

। उरण । वार्ताहर ।

मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांची जुनी नावे बदलण्याची शिफारस करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्थानकांची नावे बदलली जावीत अशी मागणी करणारे आंदोलन वगैरे कुणीही केलेले नसताना ती करण्याची शिफारस केली जात आहे. मात्र, उरण तालुक्यातील अनेक रेल्वे स्थानकांना दिलेली चुकीची नावे बदलण्यात यावीत अशी मागणी करणारी अनेक आंदोलने उरणकरांनी केली. मात्र, त्याकडे राज्य शासन स्थानिक लोकप्रतिनिधी कोणीही लक्ष देत नसल्याची खंत उरणकरांमध्ये आहे.

उरणच्या द्रोणागिरी रेल्वे स्थानकाला स्थानिक गाव असलेल्या बोकडविरा गावाचे नाव देण्याची मागणी आहे. नवघर गावाजवळ असलेल्या रेल्वे स्थानकाला न्हावा-शेवा असे नाव देऊन रेल्वेने स्थानिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. रांजणपाडा गावाच्या नव्हे तर सर्वाधिक मौजे धूतूम गावाच्या जमिनीवर वसलेल्या रेल्वे स्थानकाला देखील रेल्वेने रांजणपाडा असे नाव दिलेले आहे. ते बदलावे यासाठी मोठ मोठी आंदोलने गावकर्‍यांनी केली, मात्र आजतागायत त्यावर रेल्वेने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

अशा स्थितीत मुंबईतील मागणी नसतानादेखील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेत राज्य सरकारने तशी शिफारसदेखील केली असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त स्थानिकांपर्यत पोहोचताच भूमिपुत्रांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. राज्य शासन जर मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तेथील स्थानकांची नावे बदलत असेल तर उरणकरांनी काय घोड मारल आहे, असा जळजळीत सवाल उरणच्या स्थानिक भूमिपुत्रांकडून विचारला जात आहे.

द्रोणागीरीचे नाव बदलून बोकडविरा देण्यासाठी ग्रामपंचायत बोकडविराने सर्व ग्रामस्थांना घेऊन आंदोलन केले होते. नवघर असे नाव न्हावा शेवा स्थानकाला द्यावे यासाठीदेखील ग्रामस्थांनी अगदी टोकाचे आंदोलन केले होते. धुतूंमसाठीदेखील ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. मात्र यापैकी कोणत्याही आंदोलनाची रेल्वेने आजतागायत दखलच घेतली नाही.

विशेष म्हणजे राज्याच्या अधिवेशनात मुंबईतल्या काही स्थानकांची नावे बदलण्याबांबत केंद्राला शिफारस करण्याचा निर्णय घेतला जात होता. त्यावेळी उरणचे लोकप्रतिनिधी काय करत होते, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. त्यांना स्थानिकांची रेल्वे स्थानकांची नावे बदलायला हवीत ही मागणीच माहीत नाही की काय असेही या निमित्ताने विचारले जात आहे.

राज्य सरकारने मात्र मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांची ब्रिटीश काळातील नावे बदलण्यासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उरण तालुका हा महाराष्ट्रात नाही का, असा सवाल आहे.

Exit mobile version