। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-20 विश्वकरंडकाचा थरार रंगणार आहे. त्याआधी एक मेपर्यंत संभाव्य संघाची निवड करण्यात यावी, असा आदेश आयसीसीकडून देण्यात आला आहे. तंदुरुस्त असलेल्या आणि गेल्या वर्षभरात भारतीय संघातून खेळलेल्या क्रिकेटपटूंचीच निवड करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या 20 खेळाडूंची नावे समोर आली आहेत.
शुभमन गिल व यशस्वी जयस्वाल या दोघांची अंतिम पंधरा जणांच्या चमूत निवड झाल्यास शिवम दुबे व रिंकू सिंग या मधल्या फळीतील एकालाच भारताच्या अंतिम 15 जणांच्या संघात निवडण्यात येईल. तसेच संजू सॅमसन, के. एल. राहुल, रिषभ पंत, इशान किशन, जितेश शर्मा हे खेळाडू यष्टिरक्षणासाठी शर्यतीत आहेत. सध्या तरी राहुल, पंत, सॅमसन यांचे पारडे जड समजले जात आहे.
हार्दिक पंड्याकडून प्रतिमेला साजेशा खेळ आयपीएलमध्ये होत नाही; पण तरीही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल अशी चिन्ह नाहीत. विराट कोहलीचेही स्थान पक्के समजले जात आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव या फलंदाजांचाही समावेश पक्का आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फिरकी गोलंदाजीचा विचार करता कुलदीप यादव व युझवेंद्र चहल या फिरकीपटूंना टी-20 विश्वकरंडकाचे तिकीट बुक करता येणार आहे. रवी बिश्नोई याचे दोघांनाही आव्हान असेल; पण जडेजा व अक्षर या अष्टपैलू खेळाडूंना संधी दिल्यास कुलदीप व युझवेंद्र यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराचे स्थान निश्चित आहे. मोहम्मद सिराज, आवेश खान, अर्शदीप सिंग यांना संधी आहे.







