मालाड मेट्रो स्थानकाचे मोतीलाल ओसवाल नामकरण

। मालाड । प्रतिनिधी ।

खासगी सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीने मुंबईच्या मालाड पश्‍चिम मेट्रो स्टेशनचे ब्रँडिंग हक्क विकत घेतल्याने मुंबई मेट्रो 2 वरील मालाड पश्‍चिम स्थानकाचे नाव बदलून मोतीलाल ओसवाल मालाड मेट्रो स्थानक असे करण्यात आले आहे. ज्याचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, महाराष्ट्राला काही योगदान नाही अशा परप्रांतीयाच नाव मालाड मेट्रो स्टेशनला देण्यात आल्याने तमाम मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त होत असून मराठी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्र संरक्षण संघटना प्रणित मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या माध्यमातून या घटनेच्या निषेधार्थ मूक निषेध मोर्चा काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

परंतु 4 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस प्रशासनानकडून परवानगी न मिळल्याने महाराष्ट्र संरक्षण संघटना प्रणित मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समितीच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र घाग, उपाध्यक्ष रवींद्र शिंदे, अनिल हातेकर, सरचिटणीस उदय जागुष्टे, विभागीय पदाधिकारी अनिल जाधव आणि चेतन कोलगे यांनी मेट्रो अधिकार्‍यांना भेटून याबाबत आपले लेखी निवेदन दिलं. ज्या मराठी माणसांनी हा महाराष्ट्र घडवला, ज्या मराठी लोकांनी मुंबई महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं,ज्यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं योगदान दिलं अशा महान युगपुरुषांची नावं सोयीस्करपणे वगळून परप्रांतीयांची नावे देऊन महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणार्‍यांना जाब विचारण्यात आला व सदर नाव हटवले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. गेल्या आठ दहा वर्षात परप्रांतीयांचं महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रात होत असलेलं आक्रमण हे सोयीस्करपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. स्वाभिमानाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करता केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्लीश्‍वरांच्या तोंडावर भिरकावणार्‍या मराठी माणसाचा हा महाराष्ट्र आहे. प्रांतिक अस्मितेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या 106 हुतात्म्यांचा हा अवमान नव्हे काय?अशा संतप्त भावना मराठी भाषिकांकडून व्यक्त होत आहेत.

Exit mobile version