नागोठणे आयटीआयचे नामकरण

। नागोठणे । वार्ताहर ।

शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना थोर समाजसुधारक किंवा मान्यवर व्यक्तींचे नाव देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांनुसार राज्यातील आयटीआय संस्थांचे नाव बदलण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मंजूर केला होता. यानुसारच नागोठणे आयटीआयचे सोमवारी (दि.14) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण करण्यात आले आहे.

नागोठणे आयटीआय संस्थेचा हा नामकरण सोहळा संस्थेच्या प्राचार्या विद्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच सुप्रिया महाडिक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे गटनिर्देशक, शिल्पनिर्देशक आणि संस्थेतील कर्मचारी यांच्या मेहनतीने हा नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावणार्‍या राज्यातील 14 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे म्हणजेच आयटीआयचे नामकरण करण्याची घोषणा कौशल्यविकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. राज्यातील सरकारी आयटीआय संस्थांपैकी फक्त दोनच संस्थांची ओळख नावांद्वारे होती. उर्वरीत संस्था त्या-त्या शहराच्या किंवा गावाच्या नावाने ओळखल्या जात होत्या. उर्वरित आयटीआय संस्थांचे नामकरण करण्याबाबतच्या नागरिकांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असेही लोढा म्हणाले होते. त्याचाच एक भाग म्हणून नागोठणे आयटीआयचे नामकरण करण्यात आले आहे.

Exit mobile version