| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी, कामगार व मागासवर्गीय घटकाच्या न्याय्य हक्कासाठी लढा देणारे, रायगडचे भाग्यविधाते नारायण नागू पाटील यांची शुक्रवारी (दि.29) जयंती जिल्ह्यात साजरी करण्यात आली. अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहासह जिल्ह्यातील तालुकास्तरावर ठिकठिकाणी जयंती साजरी करून त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात शेकापच्या वतीने नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते मानकर, अशोक प्रधान, विनोद पाटील, संदीप सारंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंच, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात जयंती साजरी करण्यात आली. नारायण नागू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका चिटणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







