| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी व कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते, क्रांती योध्दा स्व. नारायण नागू पाटील तथा नाना यांची पुण्यतिथी अलिबागमध्ये विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अलिबाग येथील शेतकरी भवन येथे नानांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तेथील कर्मचारी, कार्यकर्त्यांनी स्व. नारायण पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. यावेळी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, नागेश कुळकर्णी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. अलिबागमधील प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय आणि प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या रामनारायण सभागृहात स्व.नारायण नागू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमेला मंचाचे कार्यवाह तसेच ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त नागेश कुळकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नागेश कुळकर्णी यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी कामगारांसाठी आवाज देणाऱ्या सर्व सामान्य माणसाच्या आशा आकांक्षाना अभिव्यक्ती देणाऱ्या क्रांती योध्दाची, पत्रकारिकेचे शस्त्र उपसून प्रबोधन करणाऱ्या लोकशिक्षकाची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. अशा अनेक जुन्या आठवणींना यावेळी उपस्थितांनी उजाळा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक आर.के. घरत, जेष्ठ नाट्यकर्मी, तथा लेखक शरद कोरडे, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील, वाचनालयातील कर्मचारी झेबा कूरेशी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कोरडे यांनी, तर आभार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
