। मुंबई । वृत्तसंस्था ।
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या भेटीनंतर नाना पटोले यांनी बाहेर येत भेटीसंदर्भातील माहिती दिली आहे. नाना पटोले यांनी म्हटलंय की, भारनियमनाचा प्रश्न आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या प्रश्नांवर आमच्यात चर्चा झाली आहे.
राज्यात सध्या लोडशेडींग वाढलेलं आहे. विद्युत प्रकल्प बंद पडलेले आहेत. केंद्र सरकारने राज्याला कोळशाचा पुरवठा केलेला नाहीये. यासंदर्भात राज्यातील उर्जा विभागासमोर जो प्रश्न उभा राहिला आहे, त्यासंदर्भात शरद पवारांनी काहीतरी हस्तक्षेप करावा, यासंदर्भातील मागणीसाठी ही भेट घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा जो प्रश्न आहे, त्यावर देखील चर्चा झाली. या दोन्ही प्रश्नांवर दोन दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल. त्यावर चर्चा झाली. ते पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतचा विषय आमच्या पातळीवरचा नाही. सोनिया गांधींचा हा निर्णय आहे. हायकमांडला या गोष्टी कळतात, असे त्यांनी म्हटले आहे.
नाना पटोलेंनी घेतली शरद पवारांची भेट
