| मुंबई | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्यावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. मोदींनी सोलापूर, सातारा आणि पुण्यातील प्रचारसभेतून नेहमीचंच काँग्रेस विरोधी रडगाणं गायलंय. मोदींना प्रचारासाठी सातत्यानं महाराष्ट्रात यावं लागतं, यावरुन भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार गुजरातला पळवून नेत असताना मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, कांद्यावरील निर्यात बंदी उठवताना त्यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही. पण आज पराभव दिसू लागल्यानं पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली का?असा खोचक सवालही नाना पटोले यांनी केला आहे.
संविधानाला आरएसएस आणि भाजपाचा विरोध : प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना नाना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आणि संविधानानं दिलेल्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा पहिल्या पासूनच विरोध आहे. मागील 10 वर्षांत धनगर, आदिवासी, मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची घोर फसवणूक करणार्या भाजपावर आता जनता विश्वास ठेवणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाचा घोळ घालून राजकीय प्रतिनिधीत्व मिळण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्याचं पाप नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपानं केल आहे. 400 जागा जिंकल्या की आरक्षण बदलू असं जाहीर सांगणारे मोदींचे खासदार आणि मंत्रीच आहेत. पण जनता भाजपाला घरी बसवणार याची जाणीव होताच मोदींनी भाषा बदलली. आरक्षणाचे खरे विरोधक भाजपा, आरएसएस असून संधी मिळाली तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार हे स्पष्ट आहे, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे.