नाना पटोले यांची एमजीएम रुग्णालयात भेट

सरकारने राजीनामा द्यावा; घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी

| पनवेल । वार्ताहर ।

जनाची नाही तर मनाची लाज बाळगून या सरकारने राजीनामा द्यावा, अशी काँग्रेस मागणी करीत आहे. या घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. कारण श्रीसदस्य सकाळपासून तिथे बसलेले होते. कार्यक्रम दुपारी एक वाजेपर्यंत चालू होता. त्यावेळी तापमान 42 पर्यंत गेले होते. हा सगळा प्रकार उष्माघातामुळे झाला आहे. काही लोक घरी उपचार घेत असतील, कदाचित काही लोक घरी जाऊन दगावले असतील त्याची आकडेवारी वेगळी असेल. जे लोक जागेवर मृत्यूमुखी पडले त्यांची आकडेवारी समोर आली. ही घटना म्हणजे महाराष्ट्राची बदनामी आहे. आम्ही देवाला एवढीच प्रार्थना करतो की सर्व जखमी रुग्ण सुखरूप राहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

पटोले यांनी कामोठे एमजीएम रुग्णालयात जखमी रुग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपुस केली. यावेळी हॉस्पिटल प्रशासनासमवेत चर्चा करुन रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावे या संदर्भात सूचनाही दिल्या. याप्रसंगी काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, अनिल कौशिक, नामदेव भगत, शशिकला सिंह यांच्यासह आदि उपस्थित होते.

2008 साली नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी याच ठिकाणी यापेक्षाही जास्त लोक उपस्थित होते. त्यावेळी श्री संप्रदायाने व्यवस्था आम्ही करू अशी मागणी केली होती. 300 एकर जागेतील व्यवस्था सहजतेने सांभाळता येणार नाही असे असतानाही त्यावेळचा कार्यक्रम यापेक्षाही भव्यदिव्य झाला होता, असेही ते म्हणाले.

स्वतःसाठी एअर कंडीशन असलेला मंच तयार केला पण आलेल्या श्रीसदस्यांसाठी साध्या मंडपाची ही सोय केली नाही. 13 कोटी रुपये त्या कार्यक्रमावर खर्च केले असे समजते. पण लोकांना खाली बसण्यासाठी काही नव्हते. एवढ्या प्रचंड उन्हात लोक बसली होती. त्यामुळे ही एक प्रकारची हत्या आहे. यातून सरकारचा बेजबाबदारपणा दिसून येतो. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी जनतेकडून मागणी होत आहे. सरकारला जनाची नाही मनाची तरी लाज असल्यास ते स्वतःहून राजीनामा देतील. असे केल्यास या सरकारला जनतेच्या प्रती काही भावना आहेत हे जाणवेल.

एवढी दुर्दैवी घटना घडूनही अमित शहा व देवेंद्र फडणवीस हे मुंबईमध्ये असतानाही मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत. त्यांचे सांत्वनही केले नाही. यावरून भाजप सत्तेसाठी किती लालची आहे हे काल संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. कार्यक्रमांमध्ये झालेल्या जीवितहानीची जबाबदारी ही राज्य सरकारची असून राज्य सरकारने ती मान्य करावी, अशी भूमिका यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

Exit mobile version