नाणार, सागवे बॉक्साईट उत्खनन

। रत्नागिरी । वृत्तसंस्था।

गणेशोत्सव तोंडावर असल्याने नाणार आणि सागवे या दोन्ही बॉक्साईट उत्खननाबाबतची जनसुनावणी अनिश्‍चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नाणार, सागवे ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय जाहीर केला. याबाबत जिल्हाधिकारी लवकरच अहवाल देतील, असेही ते म्हणाले.

आपल्या रत्नागिरी दौर्‍य़ाप्रसंगी शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नाणार, सागवे, बारसू येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. नाणा येथे 29 ऑगस्टला, तर सागवे येथे 5 सप्टेंबरला बॉक्साइट उत्खननाबाबत जनसुनावणी लावण्यात आली होती. मात्र कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू आहे. त्याच्या थोडाच काळ आधी ही जनसुनावणी का लावण्यात आली आहे, असा प्रश्‍न या ग्रामस्थांनी केला. सणासुदीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ही जनसुनावणी अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना ही जनसुनावणी प्रस्तावित केली होती.

आता याबाबत प्रांताधिकारी यांना अहवाल तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. सण तसेच पश्‍चिमघाट हरित क्षेत्र या सर्व गोष्टींचा विचार करुन हा अहवाल तयार केला जाईल. ते आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी राज्य व केंद्र सरकारला अहवाल देतील, असे मंत्री सामंत म्हणाले.

Exit mobile version