नंदकुमार तेलंगे रायगडमध्ये प्रथम, राज्यात तृतीय

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धेत यश

| कोलाड | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा कोलाड येथे कार्यरत असलेले प्रशिक्षित पदवीधर शिक्षक नंदकुमार अविनाश तेलंगे यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी रायगड जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात तृतीय क्रमांक मिळवत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 3 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 14 मार्च रोजी जाहीर झाला. प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) राजिप केंद्रशाळा कोलाड येथील शिक्षक नंदकुमार तेलंगे यांनी या परीक्षेत 200 पैकी 169 गुण मिळवत रायगड जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. या परीक्षेसाठी राज्यभरातून 46,068 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी 38,558 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या स्पर्धात्मक परीक्षेत नंदकुमार तेलंगे यांनी रायगड जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले.

मूळचे हेटवणे येथील असलेल्या नंदकुमार तेलंगे यांचे माध्यमिक शिक्षण कोलाड हायस्कूलमध्ये झाले आहे. सध्या ते कोलाड केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धेत यश

Exit mobile version