उद्धव ठाकरेंचा भरत गोगावलेंना टोमणा
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
गद्दार मिंध्यांना त्यांच्या बापाच्या नावावर एकही मत मिळणार नाही हे माहिती असल्यानेच त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार असे उल्लेख सुरूवातीपासूनच केले. त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरले, पण हा समोर असलेला शिवसैनिक माताभगिनींचा जनसमुदाय चोरता आला नाही. मी पुन्हा सांगतो शिवसेना मला वारसाने मिळाली आहे आणि शिवसैनिक मला माझ्या वडिलांपासून मिळाले आहेत. आता कोणी भगवा नाचवतो तर कोणी नॅपकीन.. नॅपकिन घामाने भिज़ला तरी स्वप्नांमध्ये असणारे पालकमंत्रिपद काही मिळत नाही. असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे नाव न घेता लगावला.
पोलादपूर शहरातील भैरवनाथ नगर सहाणेवरील मंडपामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंवाद मेळाव्याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा भव्य सत्कार नेते अनंत गीते, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, दक्षिण रायगड संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, शहरप्रमुख निलेश सुतार, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, विनोद पालकर,अमरदीप नगरकर यांच्याहस्ते करण्यात आला.
रायगडचं वारं फिरलं म्हणजे दिल्लीच्या तख्तालाही हादरे बसले आहेत. मोठमोठी सरकारं उलथवून टाकली आहेत. पोलादपूर ही संतांची आणि वीरांची भूमी असल्याचा उल्लेख होत असताना या ठिकाणी वारकऱ्यांचा आणि मावळयांचा भगवा फडकविणे तर सोडाच; नॅपकीन फडकविणारे फिरत आहेत. तानाजी मालुसरे यांची भूमी असून जीव गेला तरी बेहत्तर भगवा फडकविणार म्हणजे फडकविणारच,ही निष्ठा आहे. मात्र, स्वप्नातील पालकमंत्र्यांनी किती जॅकेट, कोट शिवले; किती नॅपकीन घामाने भिजवले , पण मंत्रीपद काही मिळालेच नाही, ही गद्दारांची भूमी नाही. रायगड किल्ल्यावर गद्दारांना टकमक टोक दाखविण्याची सोय आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जनसंवाद करत नाही, तर मी माझ्या कुटुंबासोबत संवाद साधतोय. तुम्ही मला आपल्या कुटुंबातला सदस्य मानता, हे माझं भाग्य आहे. ‘सरकार आपल्या दारी’ आणि लोकं सांगतायत ‘जा तुझ्या घरी, आम्ही अन्यायावर वार करणारे ‘वारकरी’. भ्रष्टाचार करा, भाजपात या, ही मोदी गॅरंटी आहे. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना स्वतःकडे घेते आणि पावन करते. महाराष्ट्रातील सरकारमध्ये असणारे मंत्री दिल्लीत आपल्या राज्याच्या दुरावस्थेबद्दल का बोलत नाहीत? ते खोके गिळून गप्प बसलेत. असे ते म्हणाले.
तुमच्याकडे स्वतःचा पक्ष कुठे आहे. तो सगळा ‘चोरबाजार’ आहे. आम्ही ज्ञानोबा, तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज, भवानी मातेची पालखी वाहू; पण भाजपची पालखी वाहणारे नाही. आम्ही शिवबांचे, भारतमातेचे भक्त आहोत, कुण्या एका व्यक्तीचे भक्त नाही. ‘देशभक्त’ नेहमी जिंकतो. तुम्ही जनता माझ्यासोबत असताना माझ्यासमोर कुणीही उभा राहू दे. मला पर्वा नाही, तुमचे मित्र म्हणजे देश नव्हे, ही जनता म्हणजे देश आहे. जनतेसाठी काम करा, ‘मतदारराजा जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे.’ आता झोपी गेलास, तर पुढे दिवससुद्धा वैऱ्याचे येतील., असं उद्धव ठाकरे म्हणाले .