नारायण अ‍ॅलर्टमुळे कळणार दरड पडताना संदेश; पोलादपूर तालुक्यातील तरुणांनी बनविले यंत्र

10 किमीपर्यंत येणार सायरनचा आवाज

। महाड । जुनेद तांबोळी ।
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाडसह पोलादपूर तालुक्यातील तळीये, साखर केवणाले गावात दरड कोसळल्याने 90 पेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात दरड व पूरग्रस्त भागातील नागरिकांना जीव गमवावा लागू नये, यासाठी पोलादपूर तालुक्यातील संवाद गावातील तरुणाने नारायण अ‍ॅलर्ट नावाने यंत्र बनविले असून तेे यंत्र डोंगर भागात लावल्यास माती खाली सरकली तरी त्याचा सायरन वाजणार आहे. यामुळे नागरिक सतर्क होऊन त्यांचा जीव वाचण्यास मदत होईल.

महाडसह पोलादपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसानीसह जीवितहानी झाली होती. दरवर्षी दरड कोसळत असल्याने अनेक मार्ग काही तास ठप्प पडतात. यातून मार्ग निघणे गरजेचे असून तंत्रज्ञानच्या युगात अद्यावत यंत्र निर्माण करणे गरजेचे बनले आहे. पोलादपूर तालुक्यातील संवाद गावातील तरुणाने आपल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करत नारायण अ‍ॅलर्ट नावाचे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र नदीच्या किनारी, डोंगर भागात लावल्यास पुराची पाणी पातळी वाढली तर सेन्सर सिस्टिम चालु होऊन सायरनचा आवाज 10 किमी अंतरावर जाईल. तसेच डोंगरमध्ये लावल्यास माती किंवा दगड खाली आल्यास सेन्सर वाजेल. यामुळे नागरिक सतर्क होऊन घरे खाली करतील, अशी यंत्रणा बनविण्यात आल्याची माहिती विशाल दिनकर गायकवाड यांनी दिली आहे

यावेळी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, भारतात असे अ‍ॅलर्ट सिस्टिम कोठेही नाही. यामुळे स्वत तयार करत 1 पुरग्रस्त गाव, 2 दरड क्षेत्र गाव या ठिकाणी मोफत लावत आहे. या यंत्राच्या सायरनचा आवाज 1/10 किलोमीटर अंतरावर जाऊ शकतो. सद्यस्थितीत सदरचे यंत्र विजेवर चालविले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यास यंत्र बंद पडण्याची शक्यता असल्याने बॅटरीवर चालविण्यात येणार आहे. यासाठी खर्च जास्त असल्याने निधी जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निधी मिळाला तर सर्व पुरग्रस्त गाव, दरड क्षेत्र गावात आपण हे यंत्र लावु शकतो. मात्र यासाठी सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन या तरुणाने केले आहे गायकवाड यांनी हे यंत्र सचिनदादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन तसेच पोलादपूरचे राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या विषेश सहकार्याने तयार केले असल्याचे सांगितले.

यंत्राला जीपीएस सिस्टिम लावता येते. यामुळे संकट पुर्व सुचना आपत्कालीन विभाग, पोलीस स्टेशनमध्ये कॉल व एसएमएस संदेश देता येणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास 103 गावे दरदग्रस्त आहेत. यामध्ये महाड 49, पोलादपूर 15, रोहा 3, म्हसळा 6, माणगांव 5, पनवेल 3, खालापूर 3, कर्जत 3, सुधागड 3, श्रीवर्धन 2 व तळा 1 अशी संख्या असून दरडग्रस्त गावातील नागरिकांनी व तेथील लोकप्रतिनिधींनी भविष्यातील धोका लक्षात घेता सदरचे यंत्र बसविणे गरजेचे आहे.

विशाल दिनकर गायकवाड

Exit mobile version