रासळ उपसरपंचपदी नरेश खाडे बिनविरोध

। पाली /बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्येष्ठ सदस्य नरेश खाडे यांची शेकाप नेते सुरेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच शिरीष मांढरे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर नरेश खाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नरेश खाडे गेली दहा वर्षे अत्यंत संघर्षमय वातावरणातून या ग्रामपंचायतीचे नेतृत्व करीत आहेत. प्रचंड विरोध असतानाही त्यांनी ग्रामपंचायतीला विकासकामाच्या माध्यमातून अव्वलस्थानी आणली आहे. रासळ ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी केलेली विकासकामे ही नजरेत भरणारी असून त्यांच्या कार्यपद्धतीचे ग्रामस्थांकडूनच नव्हे तर संपूर्ण सुधागड तालुक्यातून कौतुक होत आहे.
नरेश खाडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली असून शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आरीफ मणियार, शेतकरी कामगार पक्ष पाली शहर सहचिटणीस संजोग शेठ, पराग मेहता, सुधीर साखरले यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सरपंच विष्णू मोरे, मावळते उपसरपंच शिरीष मांढरे, धनंजय म्हस्के, रिया म्हस्के, भीमा सखाराम पवार, मंगेश यशवंत म्हस्के यांच्यासह सर्व सदस्य, सदस्या, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच विष्णू मोरे यांनी कामकाज पाहिले तर ग्रामसेवक ईश्‍वर पवार यांनी सहकार्य केले.

Exit mobile version