नारी शक्ती अ‍ॅप बंद झाल्याने नाराजी

। सावर्डे । वृत्तसंस्था ।

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नारी शक्ती अ‍ॅप कार्यान्वित नसल्याने महिलांची अडचण झाली आहे. योजनेचे अर्ज ऑनलाईन होत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. याचा निषेध म्हणून महिलांनी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यावर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते; मात्र आता अर्ज ऑनलाईन होत नसल्याने संताप आणि नाराजीचे वातावरण दिसून येते. नारी शक्ती अ‍ॅप आता आज सुरू होईल, या आशेने महिला ग्रामपंचायत, महा ई-सेवा केंद्र आणि मिळेल त्या ठिकाणी हेलपाटे मारत आहेत. नारी शक्ती अ‍ॅप चालत नसल्याने सगळ्या ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. 17 ऑगस्टला ऑनलाईन झालेल्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मग ज्या महिलांचे अर्जच ऑनलाईन झाले नाहीत त्यांचे काय? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. गेले पंधरा दिवस नारी शक्ती अ‍ॅप मृतावस्थेत आहे. या योजनेच्या नोंदणीसाठी शासनाने पोर्टल उपलब्ध करून दिले; मात्र हे पोर्टलही चालत नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. याचा निषेध करण्यासाठी स्वतंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे.

Exit mobile version