श्रीपाद लेले यांनी केले मार्गदर्शन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागच्या महिला विभागाच्या वतीने चैत्र गौरीपूजन, हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात श्रीपाद लेले यांच्या अनुभवांवर आधारित नर्मदा परिक्रमा या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी नर्मदा परिक्रमा आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना घडविली. ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबाग ही तालुक्यातील उपक्रमशील मध्यवर्ती संस्था आहे. नेहमी विविध उपक्रमांचे ती आयोजन करते. त्याअंतर्गत चैत्र गौरी पूजनाचे श्रीराम मंदिर, ब्राह्मण आळी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पायी नर्मदा परिक्रमा केलेल्या श्रीपाद लेले यांनी नर्मदा परिक्रमा विषयी व्याख्यानातून उपस्थितांसमोर आपल्या अनुभवांचा खजिना उघडला. त्यांना प्रवासात आलेले अनुभव, जंगले, नद्या-उपनद्या, मानवी स्वभाव, कथा यांनी उपस्थित भारावून गेले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागचे अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या हस्ते श्रीपाद लेले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी महिला विभाग प्रमुख मेघना कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तर, शरद कोरडे यांनी श्रीपाद लेले यांची ओळख करुन दिली. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रफुल्ल राऊत यांनी केले. डी.डी. नाईक, गजेंद्र दळी, सुभाष क्षिरे, यशवंत थळे, आर.के. घरत, शुभदा ठोसर, चारुशीला कोरडे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.