आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
| मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. पण तरीदेखील ठाकरे गटाला एक थोडासा दिलासा राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (दि.10) शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या निकालाचं वाचन केलं. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळ पक्ष ज्यांचा त्यांचाच राजकीय पक्ष, असा मोठा निकाल दिला. त्यामुळे खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरवली आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व 16 आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहेत. तर, ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देण्यात आले. पण या निकालात ठाकरे गटाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळाला. विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचे देखील सर्व आमदार पात्र ठरवले आहेत.
यावर शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदार आपात्रतेप्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मूळ राजकीय पक्षा संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीची हत्या करणारा आहे. तसेच, आता सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाच्या वकिलांना शिंदे गटाच्या प्रतोदांचा व्हीप मानावा लागणार सर्वोच्च न्यायालय वकील सिद्धार्थ शिंदे यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला. पहिल्या गटाचा निकाल आला आहे. उद्धव ठाकरे यांची मागणी फेटाळली आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असं वकील शिंदे यांनी सांगितलं. राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त निर्णय देऊ शकतात. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात यावं लागेल. नार्वेकर यांनी त्यांच्या सदसदविवेक बुद्धीने निर्णय दिला आहे. कोणताच आमदार अपात्र नाही असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. हा निकाल देताना त्यांनी भरत गोगावले यांचा व्हीप मान्य करावा लागेल. याचा अर्थ जर उद्धव ठाकरे यांचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले नाहीत तर त्याच्यावर अपत्रतेची तलवार येऊ शकते, अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली.
ठाकरे गटाकडे आता पुढचा पर्याय काय? विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेला निकाल हा पूर्णपणे शिंदे गटाला दिलासा देणारा आहे. त्यामुळे ठाकरे गट आता पुन्हा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतं. उद्धव ठाकरे आता पुन्हा सुप्रीम कोर्टात जावून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रत्येक सुक्ष्म गोष्ट निदर्शनास आणून दिली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच दोन दिवसांपूर्वी भेट घडून आली होती. याबाबतही ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात कागदोपत्री माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पण सध्यातरी एकनाथ शिंदे यांच्याकडेच पक्ष आला आहे. तसेच, भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता मिळाली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली, खोक्यांच राजकारण झालं, तर अशाच प्रकारे त्यांना वाचवलं जाणार असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपाला आपलं संविधान बदलायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान आणायच आहे, ते स्पष्ट झाले.
आदित्य ठाकरे
काल नार्वेकरांनी भेट घेतली तेव्हाच निकाल स्पष्ट झाला होता. लोकशाहीची हत्या केली. पक्षांतराचा राजमार्ग आज राहुल नार्वेकरांनी दाखवला. शिंदेंची शिवसेना होउच शकत नाही. नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार.
उद्धव ठाकरे
या निर्णयाचे मला आश्चर्य वाटले नाही. मी आमच्यात चर्चा करत असताना म्हणालो होतो की, उद्धव ठाकरेंना अनुकूल असा निर्णय लागणार नाही. सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी काय निकाल लागणार याबाबत आधीच भाष्य केलेले होते. त्यामुळे त्यांना आपणच जिंकू ही खात्री होती, तसे या नेत्यांनी ध्वनित केले होते. मी जो निकाल ऐकला त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. या निकालाच्या भाष्यावरून उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल अशी खात्री निकालावरून वाटते. दोन-तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि सहा-सात महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय आता जनतेच्या न्यायालयात गेला आहे. जनताच यावर निर्णय घेईल. आम्ही महाविकास आघाडी म्हणून जनतेसमोर जाऊन सदर विषय मांडू. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल न्यायालयीन नसून राजकीय निकाल आहे. त्यामुळे आम्हाला उत्तम संधी प्राप्त झाली आहे.
शरद पवार
अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी